चेतन ननावरे, मुंबईराज्य शासनाच्या वैध मापन शास्त्र विभागाने राज्यातील मॉडेल अप्रुव्हल नसलेल्या पेट्रोलपंपांवर धडक कारवाई करत पंप सील केल्याने बहुतेक पेट्रोलपंपांवर टॅक्सी आणि रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी ही धडक कारवाई केल्याने शासन तिजोरीत दंडाच्या स्वरूपात कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. याशिवाय पेट्रोलपंप चालकांनी पाण्डेय यांचा धसका घेतला आहे.गेल्या १० वर्षांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पुणे याठिकाणी सीएनजी पंप सुरू आहेत. तर राज्यात बऱ्याच शहरांत एलपीजी पंप आहेत. हे पंप उभारताना गॅस पुरवठादार कंपन्यांनी मॉडेल अप्रुव्हल हे प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. गॅस पुरवठा करणाऱ्या मशिनचे स्टँपिंग करण्याची जबाबदारी ही पुरवठादार कंपन्यांची होती. मात्र त्याचा फटका डीलर्सला बसत असल्याचा आरोप पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष उदय लोध यांनी लोकमतशी बोलताना केला आहे.लोध यांनी विभागाच्या कारवाईचे समर्थन करताना भारत पेट्रोलियमने डीलर्ससोबत केलेल्या करारांत स्टँपिंगची रक्कम स्वत: भरणार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे डीलर्सवर दंडा बोजा पडणार नाही आहे. याउलट हिंदुस्थान पेट्रोलियमसोबत काही प्रमाणात चर्चा सुरू असल्याचे सांगितले. संघटनेचे मुंबई अध्यक्ष रवी शिंदे यांनी एचपीसोबत मंगळवारी झालेल्या चर्चेअखेर दंडाचा बोजा उचलण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे गुरूवारी नियंत्रक संजय पाण्डेय यांच्यांसोबत चर्चा करून सील केलेले १० सीएनजी पंप पुन्हा सुरू करण्याची मागणी करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
पेट्रोलपंपांवर ‘चुळबुळ’, पाण्डेय यांची दहशत
By admin | Published: December 18, 2014 5:28 AM