लोकमत न्यूज नेटवर्कठाणे/नाशिक : कॉम्प्युटरची चिप बसवून कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी उघडलेले छापासत्र सुरू आहे. राज्यात एकूण ८ पेट्रोल पंपांना सील ठोकले असून पाच आरोपींना अटक केली आहे. पेट्रोलपंपांवर सर्रास होणाऱ्या ग्राहकांच्या लुटमारीचे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखेने जवळपास महिनाभर निरीक्षण केले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी शनिवारपासून पेट्रोलपंपांवर छापा टाकण्यास सुरुवात केली. त्यात ठाण्यातील चार, नाशिक जिल्ह्यातील दोन, तर पुणे आणि खोपोली येथील प्रत्येकी एक अशा आठ पेट्रोलपंपांवर छापा टाकला. विपुल डेडिया (मानपाडा, कल्याण), राजेशकुमार उमापती पांडे (भिवंडी), दामोदर पांडुरंग कानडे (ठाणे), सुशील इंद्रभान पाठक ( खोपोली), सीताराम लहानगे (कोनगाव, भिवंडी) यांस अटक करण्यात आली. विपुल डेडिया आणि सुशील पाठक यांना २० जूनपर्यंत, तर उर्वरित आरोपींना २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ग्राहकांना पेट्रोल वितरित करणाऱ्या मशीनच्या ‘पल्सर असेंब्ली’मध्ये विशिष्ट चीप बसवली की, मशीनवर दिसणारे प्रमाण आणि प्रत्यक्षात वाहनामध्ये भरले जाणारे पेट्रोल यामध्ये तफावत येते. ती किती ठेवायची, हे पंपचालकांवर अवलंबून असते. ‘पल्सर असेंब्ली’मध्ये चीप बसवल्यानंतर मशीन वजन आणि मापे निरीक्षण विभागाकडून सील केली जाते. हे सील पंपचालक तोडू शकत नाही. वजन आणि मापे निरीक्षण विभागाचे अधिकारी मशीन सील करतात, तेव्हा ‘पल्सर असेंब्ली’मध्ये चिप बसवून केलेली हेराफेरी त्यांना दिसत नाही का, हा स्वतंत्र संशोधनाचा मुद्दा आहे. सर्वाधिक घोळ भिवंडीमध्येपोलिसांनी आतापर्यंत धाडी टाकलेल्या बहुतांश पेट्रोल पंपांवर प्रत्येकी ५ लीटर पेट्रोलमागे साधारणत: २०० मिलिलीटरची हेराफेरी आढळून आली. भिवंडी येथील कोनगाव येथील रतन पेट्रोल पंपाने तब्बल ७०० मिलिलीटरची हेराफेरी केल्याचे आढळले.
पेट्रोलपंपांवर छापासत्र सुरूच
By admin | Published: June 20, 2017 2:28 AM