नम्रता फडणीस,
पुणे-गोळीबार मैदान येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इमारतीमधील लिफ्ट गेल्या ८ ते १० वर्षांपासून बंद असल्याने भविष्य निर्वाह निधी (पीएफ)च्या कार्यालयात ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक आणि कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बोर्ड आणि पीएफ या दोन्ही केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या शासकीय कार्यालयांच्या अंतर्गत वादातील परिणामामुळे लिफ्ट दुरुस्तीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. या इमारतीच्या मागच्या बाजूस दुसऱ्या मजल्यावर पीएफ चे कार्यालय आहे. बोर्डाच्या मालकीची असलेली ही जागा भाडेकराराने पीएफ कार्यालयाला देण्यात आली आहे. पीएफच्या कार्यालयात जाण्यासाठी लिफ्ट असूनही त्याच्याबाहेर बाकडा लावण्यात आल्याने ती नक्की बंद आहे कि बंद ठेवण्यात आली आहे हे लक्षात येत नाही. पीएफ आॅफिसच्या कार्यालयात सातत्याने ज्येष्ठ नागरिकांचा राबता असतो, अगदी किरकोळ कारणांसाठी ज्येष्ठांना याठिकाणी चकरा माराव्या लागतात. भर उन्हात जिने चढून जाणे हे ज्येष्ठांसह कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक गोष्ट ठरत असतानाही दोन्ही विभागाकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. पीएफ प्रशासनाच्या मते ही लिफ्ट जवळपास दहा वर्षांपासून अशीच सुरू होती. वारंवार दुरूस्ती करूनही ती बंद पडत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जीवित हानी होऊ नये म्हणून ‘डेंजर झोन’म्हणून ती बंद ठेवण्यात आली आहे. याउलट बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लिफ्टच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी ही पीएफ कार्यालयाकडे होती, मात्र देखभालीचा खर्च उचलणे अशक्य असल्याचे त्यांनी पत्राद्वारे कळविले आहे. दोन्ही विभागांच्या वादात ही लिफ्ट बंद अवस्थेत आहे. भाडेवाढीसाठी नागरिक वेठीस? ही लिफ्ट कधी सुरू होणार? याबाबत अनेकदा नागरिकांकडून पीएफ कार्यालकडे विचारणा करण्यात आली, मात्र आम्हाला माहीत नाही, बोर्डाकडे चौकशी करा, अशी उत्तरे त्यांना ऐकायला मिळत असल्याचे नागरिकांकडूनच सांगण्यात आले. या अधिक माहिती काढली असता कळाले की बोर्डाने पीएफ कार्यालयाकडे भाडेवाढ मागितली होती, ती देण्यात आली नसल्याने बोर्डाने लिफ्ट बंद करून पीएफ कार्यालयावर भाडेवाढीसाठी दबाब आणला जात असल्याही चर्चा आहे. दरम्यान, आता या दोन्ही विभागात नव्याने भाडेकरार करण्यात आला असून, त्यामध्ये लिफ्टचा मुददा समाविष्ट करण्यात आल्याचे पीएफ कार्यालयाचे म्हणणे आहे, बोर्डानेही काही अंतर्गत मुददे होते हे मान्य करीत आता चर्चेअंती या मुद्यांवर मार्ग निघाला असल्याचे सांगितले. येत्या तीन ते चार महिन्यात नवीन लिफ्ट बसविली जाईल असेस्पष्ट केले आहे. बोर्ड आणि पीएफ कार्यालय यांच्यामध्ये काही मुददे होते. ते आता चर्चेअंती मिटले आहेत. ही लिफ्ट मेंटेनन्सच्या पलीकडे गेली आहे, असे पीएफ कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यानुसार लिफ्टसंदर्भात नवीन टेंडर काढले आहे. येत्या ६ जूनला हे टेंडर ओपन होणार आहे. लवकरच नवीन लिफ्ट बसविली जाईल. - विजय चव्हाण, अभियंता, कँंटोन्मेंट बोर्ड