नागपूर : अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कायद्याची भीती उरलेली नाही. त्यामुळे अशा भेसळखोरांवर कायदेशीर कारवाई करतानाच त्यांचे फोटो वर्तमानपत्रात छापून त्यांचे काळे कारनामे लोकांपर्यंत आणा, अशी सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवीन कार्यालय आणि प्रयोगशाळेचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट उपस्थित होते. गडकरी म्हणाले, गुणवत्ता व भेसळीचे प्रश्न निर्माण होत आहेत. यात आपण स्वत: लक्ष देत आहोत. पूर्वी फूड इन्स्पेक्टर भेटी द्यायचे. ती मंथली लिफाफा भेट असायची. आता परिस्थिती कदाचित बदलली असेल. पण भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी यंत्रणा उभारून सेवा देण्याचे आवाहन त्यांनी केले.डब्बेछाप डिझाईन बदलागडकरी यांनी भूमिपूजनाला आल्याआल्या प्रस्तावित इमारतीचा आराखडा व छायाचित्र पाहिले. ते पाहून गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, या इमारतीचा नकाशा पीडब्ल्यूडीछाप वाटतो. तीच डब्बेछाप इमारत तयार केली जात आहे. या इमारतीचे नवे डिझाईन करा. पार्किंगसाठी भरपूर जागा सोडा. परिसराचे सौंदर्यीकरण, इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती आदींचा अंतर्भाव यात करण्याची सूचना त्यांनी केली.
भेसळखोरांचे फोटो वर्तमानपत्रात छापा, नितीन गडकरींची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:49 AM