मुंबई : भाजप-शिवसेना पक्षात सुरु असेलल्या सत्तासंघर्षात मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटू न शकल्याने आणि विधानसभेची मुदत संपल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. तर फडणवीस यांनी राजीनाम दिल्यानंतर राज्यपाल यांनी तो तात्काळ मंजूर सुद्धा केला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून फडणवीस यांचा फोटो हटवण्यात आला असून त्याजागी राज्यपाल कोश्यारी यांचे छायाचित्र पाहायला मिळत आहे.
गेली पाच वर्षे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून फडणवीस यांचा फोटो पाहायला मिळायाचा. संकेतस्थळ उघडताच फडणवीस यांचा फोटो व खाली माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस असे लिहलेले पाहायला मिळत होते. निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस यांच्या राजीनामा देण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा फडणवीस यांचे फोटो संकेतस्थळावर होते. मात्र त्यांनी राजीनामा देताच त्यांचे फोटो हटवण्यात आले आहे.
तर त्यांच्या जागी आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा फोटो अपडेट करण्यात आला आहे. मात्र त्यांच्या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर, त्यांच्या बद्दलची माहिती मात्र त्यात अपलोड करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. मात्र असे असले तरीही फडणवीस यांनी राजीनामा देताच काही क्षणांमध्येच त्यांचा फोटो काढून राज्यपाल यांचा फोटो अपलोड करण्यात आल्याने संकेतस्थळ हाताळणारे कर्मचारी किती सजग आहेत याची प्रचिती आली.