मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच ते उद्धव ठाकरे यांच्या समवेत अनेक बैठकांना आणि कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. आता आदित्य ठाकरे यांचे स्थान आणखीच उंचावल्याचे दिसत आहे.
उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या दालनात आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे देसाई यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही आहे. तर भिंतीवर दुसऱ्या बाजुला आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. त्यामुळे शिवसेना मंत्र्यांसाठी आमदार आदित्य ठाकरे देखील बाळासाहेबांप्रमाणेच पूज्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने त्यांनी शनिवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात चर्चा केली. या बैठकीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोत सुभाष देसाई यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो दिसत आहे.