मुंबई : गुन्हेगार आणि सत्ताधारी नेत्यांमधील संबंधांमुळे गृह खाते आणि पोलीस प्रशासन माफियांशी जुळवून घेत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो वारंवार समोर येत असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तडीपार गुंड राजू बाटला याच्यासोबतचा फोटो प्रकाशात आल्याचा आरोप आपने केला आहे.अकबर हुसैन उर्फ राजू बाटला याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत तस्करी, खंडणी, खून, जबरी चोरीसारख्या तब्बल २३ गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी राजू बाटलाला अटक करण्यात आली होती. राजू बाटला सध्या तडीपार असून मुख्यमंत्र्यांसोबत त्याचा फोटो येणे गंभीर बाब असून या फोटोची सत्यता तपासण्याची मागणी आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतोच कसा, असा प्रश्नही मेनन यांनी या वेळी उपस्थित केला. खुद्द मुख्यमंत्र्यांना अशा गुन्हेगारांपासून लांब ठेवण्यात पोलीस अपयशी ठरत असतील तर सामान्य जनतेचे रक्षण कसे करणार, असा सवाल मेनन यांनी केला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुंडांचे सत्ताधारी भाजपा नेत्यांसोबतचे फोटो वारंवार समोर येत आहेत. दाऊदचा सहकारी रियाज भाटी, बुकी अनिल जयसिंघानी, बाबा बोडके आदी गुंडांच्या राजकीय जवळिकीनंतर आता तडीपार राजू बाटलाचे प्रकरण समोर आल्याने गृह खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दिवसेंदिवस पोलिसांवरील विश्वास उडत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. (प्रतिनिधी)उगाच तथ्यहीन शंका काढू नका - मुख्यमंत्री १ज्यावर उत्तरे देऊन झाली, तेच तेच मुद्दे पुन्हा उकरून काढणे चुकीचे असून तथ्यहीन शंका उपस्थित करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री कार्यालयाने आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांच्या आरोपांना फेटाळून लावले आहे. २राजू बाटलासोबतचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे छायाचित्र १५ आॅगस्ट २०१५ रोजीचे आहे. ३२०१५ मधील अशाच एका कार्यक्रमात मुंबई महापालिकेतील काँग्रेस नगरसेविका खैरून्निसा हुसेन याही सहकुटुंब आल्या आणि त्यांच्यासमवेत त्यांचा पती अकबर हुसेन उर्फ राजू बाटला आला होता. त्या वेळी बहुतेक उपस्थितांनी रांगेत उभे राहून मुख्यमंत्री तसेच इतरही अनेक मान्यवरांसोबत छायाचित्रे काढली होती, असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. ४तसेच बाबा बोडकेसोबतच्या छायाचित्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने यापूर्वीच स्पष्टीकरण दिले होते. पुण्यात महिला सुरक्षेसंबंधी अॅपचे लोकार्पण करण्याचे निमंत्रण देण्यासाठी उज्ज्वला हावरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यास आल्या होत्या. त्यांच्यासमवेत आणखी दोन लोक होते. त्यांनी परत जाताना छायाचित्र काढण्याची विनंती केली, त्यामुळे ते छायाचित्र काढण्यात आले. त्यामुळे तेच तेच मुद्दे पुन्हा उकरून काढणे सर्वथा गैर आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या उत्तरात म्हटले आहे.
तडीपार बाटलासोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो
By admin | Published: November 09, 2016 6:09 AM