अहमदनगर : अकोले पंचायत समितीत (जि. अहमदनगर) राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे अकोल्यात सेना-भाजपमध्ये राडा झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जिल्ह्यात सर्वाधिक चार पंचायत समित्यांवर भाजपचे सभापती झाले आहेत. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला प्रत्येकी तीन, सेनेला दोन, महाआघाडीला एक, तर गडाख यांच्या शेतकरी क्रांती पक्षाला एक सभापतीपद मिळाले आहे. तीन ठिकाणी प्रस्थापित घराणी सत्तेवर बसली आहेत. अकोले येथे सेना, भाजप व राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी चार सदस्य होते. सेना-भाजप युतीचे बहुमत होत असताना राष्ट्रवादीने सेनेला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे सेनेने मिळवत भाजपला टांग मारली. सेनेने अनपेक्षितपणे राष्ट्रवादीची मदत घेतल्याने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सेनेच्या सदस्यांना पोलिसांनी बंदोबस्तात घरी पोहोचविले. अकोल्याप्रमाणेच मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघातील कर्जत पंचायत समितीत त्रिशंकू अवस्था होती. तेथे भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन, तर सेना व अपक्षांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. सेनेने भाजपला व अपक्षाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने चिठ्ठी टाकून सभापती निवडावा लागला. त्यात सभापतीपद भाजपला तर उपसभापतीपद सेनेला मिळाले. पारनेर पंचायत समितीत राष्ट्रवादी व सेना प्रत्येकी चार तर कॉंग्रेसचे दोन सदस्य आहेत. सेना व राष्ट्रवादी यांच्यातील भांडणाचा फायदा उठवत कॉंग्रेसचे राहुल झावरे यांनी राष्ट्रवादीच्या मदतीने सभापतीपद मिळविले.
पिचडांची शिवसेनेशी युती
By admin | Published: March 15, 2017 12:25 AM