मुंबई : महसूल खात्यातील एका लाच प्रकरणावरून विरोधकांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली असताना प्रदेश भारतीय जनता पार्टीने त्यांची पाठराखण केलेली नाही. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे सांगितल्याने खडसे या मुद्यावर पक्षात एकटे तर पडले नाहीत ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मुख्यमंत्रीच नव्हे तर राज्य मंत्रिमंडळातील कोणताही सहकारी मंत्री खडसे यांच्या बचावासाठी समोर आलेला दिसत नाही. खडसे यांच्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे साधे पत्रकदेखील प्रदेश भाजपाने अद्याप काढलेले नाही. पक्षाच्या एकदोन प्रवक्त्यांनी टीव्ही चॅनेलवर खडसेंचा बचाव करण्याचा प्रयत्न केला तेवढाच. खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबाबत पक्षाच्या या अनास्थेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.खडसे यांच्या कार्यालयात वावर असलेला गजानन पाटील याने ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात मंत्रालयाच्या गेटवर एसीबीने त्याला अटक केली होती.महसूल विभागातील जमिनीचे प्रलंबित प्रकरण मंजूर करवून घेण्यासाठी ही लाच मागितल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.यावर आज मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणी चौकशीमध्ये राज्य शासन कुठलाही हस्तक्षेप कोणत्याही बाजूने करणार नाही वा दबाव टाकणार नाही. एसीबी या प्रकरणाचा ट्रॅक तीन महिन्यांपासून ठेवून होती. त्या आधारे ते चौकशी आणि कारवाई करीत आहेत. या प्रकरणात एसीबीने आधी आपल्याशी चर्चा केलेली नव्हती. चौकशी स्वतंत्रपणे करण्याचा त्यांचा अधिकार आहे. (विशेष प्रतिनिधी)खडसे भरणार खटला : महाजनांना काढणार नाहीगजानन पाटीलच्या अटकेच्या अनुषंगाने आपल्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या सर्वच व्यक्तींविरुद्ध आपण अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असे खडसे यांनी आज पत्रकारांना सांगितले. सीबीआयच काय, अन्य कोणत्याही स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी होऊ द्या, असे आव्हान त्यांनी दिले. बिनबुडाच्या आरोपांवर मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही. आपले ओएसडी उन्मेष महाजन यांनाही काढणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.राजीनामा द्या : विखेविधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी होईपर्यंत तरी त्यांना मंत्री पदापासून दूर ठेवा, असे ते म्हणाले. गजानन पाटीलच्या घराची झडतीजळगाव : ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गजानन लक्ष्मण पाटील याच्या मेळसांगवे (ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) येथील राहत्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने झाडाझडती घेतली. सुमारे दीड तास ही तपासणी सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथक दुपारी एक वाजेच्या सुमारास मेळसांगवे येथे दाखल पथकाने पाटील यांच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली.