मुंबई : जिथे साहित्य-कलांचा आदर केला जातो, तीच संस्कृती विकसित मानली जाते. विविध कलागुणांचा संपन्न वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात यापुढे चित्र-शिल्पकलेलाही राजाश्रय मिळवून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्लोक आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘दि नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्र-शिल्पकला प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ‘प्रादेशिकतेचा पुनर्विचार’ (रिथिंकिंग दी रिजनल) या संकल्पनेवर आधारीत ‘एनजीएमए’ येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २0व्या शतकाच्या आरंभापासूनची राज्याच्या कानाकोपऱ्यातील कलावंतांनी रेखाटलेली रंगचित्रे आणि कलावस्तूंचा समावेश असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. कलासक्त असलेले मुख्यमंत्री प्रदर्शनातील कलाकृती पाहून अक्षरश: भारावून गेले.यावेळी ‘एनजीएमए’च्या अध्यक्षा डॉ. फिरोझा जे. गोदरेज, खासदार व ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन विजय दर्डा, ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सच्या माजी अधिष्ठाता व विद्यमान प्राध्यापक डॉ. मनीषा पाटील, एनजीएमए डायरेक्टर शिवप्रसाद खेन्नेड आणि श्लोकच्या संस्थापिका व ‘रिथिंकिंग दि रिजनल’च्या प्रकल्प संचालक शीतल दर्डा उपस्थित होते. प्रारंभी आपल्या भाषणात खासदार दर्डा यांनी कलाक्षेत्राकडे विशेषत: चित्र-शिल्पकलेबाबत शासन उदासीन असल्याचे सांगत या कलेसाठी विशेष पारितोषिक सुरू करण्याची मागणी केली. तर राज्यातील कलावंतांना वाव मिळण्यासाठी कला दालनांची आवश्यकता असून जे.जे. स्कूल आॅफ आटर््समधील पदे तसेच सांस्कृतिक खात्यातील आर्ट डायरेक्टरचे पद गेल्या आठ वर्षापासून रिक्त आहे, याकडे राजेंद्र दर्डा यांनी लक्ष वेधले. हाच धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र कायमच कलेच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. आपल्या अजिंठा लेण्यांपासून प्रेरणा घेत पार चीनमध्ये शिल्पकला विकसित झाली. हा आमचा समृध्द वारसा आहे. मात्र, गेल्या काही काळात चित्र-शिल्पकला दुर्लक्षित राहिली. त्यामुळे या कलेसही राजमान्यता मिळवून देऊ. त्यासाठी कलाप्रेमी ‘दर्डा’ परिवाराच्या सूचनांचा नक्की विचार करु, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. लोकमत समूहाच्या माध्यमातून कायमच कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. नवीन कलाकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचे काम झाले. श्लोकच्या संस्थापिका शीतल दर्डा हीच परंपरा पुढे चालवित आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. कार्यक्रमानंतर या उद्घाटनासंदर्भातील टिष्ट्वटही मुख्यमंत्र्यांनी केले.श्लोकच्या माध्यमातून उदयोन्मुख कलाकारांची कला जगापुढे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. गतकाळातील महाराष्ट्रीयन कलांच्या मनोवेधक चित्रणातून राज्यातील विविधताच प्रतिबिंबित होते. यासाठीच ‘रिथिंकिग द रिजनल’ म्हणजेच प्रादेशिकतेचा पुनर्विचार हे प्रदर्शन श्लोकच्या प्रवासातील आणखी एक खंबीर पाऊल आहे, अशी भावना श्लोकच्या संस्थापिका शीतल दर्डा यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. लोकमतचे व्हाईस पे्रसिडेन्ट बिजॉय श्रीधर यांनी सूत्रसंचालन केले. कला प्रदर्शन पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच जे. जे. स्कुल आॅफ आर्टसमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चित्र-शिल्पकलेला राजाश्रय देऊ
By admin | Published: August 08, 2015 2:09 AM