माथेरान : माथेरानजवळ असणाऱ्या जंगलामध्ये वन्य पशूंचा वावर आहे. असेच शार्लोट तलाव रस्त्यावर एक दुर्मीळ जातीचे भेकराचे पिल्लू ६ ते ७ दिवस अगोदर जन्मलेले भुकेने व्याकूळ अवस्थेत आढळून आले. त्यास पोलिसांनी जीवदान दिले.बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या निदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे, एच. आर. मांगुळकर, महिला पोलीस शिपाई आशा ठाकूर यांना शार्लोट तलाव जंगलाच्या बाजूने पेट्रोलिंग करताना हे भेकर आढळून आले. त्यांनी त्या वन्यजीवाला पोलीस ठाण्यात आणून सुरक्षित ठेवून त्वरित माथेरान वन विभागाला याची सूचना केली. वन विभागाचे माथेरानमधील वनपाल गणपत चव्हाण व वनरक्षक जीवनसिंग सुलाने तसेच वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष गिरीश पवार हे पोलीस ठाण्यात दाखल झाले व त्या भेकराची तपासणी करून तत्काळ माथेरानमधील पशुसंवर्धन अधिकाऱ्याला याची माहिती दिली. त्यानुसार माथेरानमधील पशुसंवर्धन हॉस्पिटलमध्ये त्याची तपासणी होऊन त्या भेकरास लहान असल्याने मुंबईमधील नॅशनल पार्क येथील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या देखरेखीत नेण्यात आले.>आम्ही पेट्रोलिंग करत असताना शार्लोट तलाव येथील जंगलातून हे भेकर रस्त्यावर ओरडत आले. कदाचित भुकेने व्याकूळ झाल्याने ते पळू शकत नव्हते म्हणून आम्ही त्यास आणून वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुरक्षित सुपूर्द केले.- राजवर्धन खेबुडे, पोलीस उपनिरीक्षक, माथेरान>माहिती मिळाल्यावर आम्ही त्यास पाहिले व पंचनामा करून ते ताब्यात घेऊन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून याची तपासणी करून ते सुरक्षित मुंबई येथील नॅशनल पार्क येथील वन विभाग अधिकारी व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ठेवले आहे.-गणपत चव्हाण, वनपाल, माथेरान>माथेरान वन विभागाचे अधिकारी भेकराचे पिल्लू घेऊन हॉस्पिटलमध्ये आले, त्याला तत्काळ दोन सलाईन लावून ते लहान असल्याने जंगलात जगू शकत नाही म्हणून पुढील संगोपनासाठी त्यास मुंबईमधील नॅशनल पार्कमध्ये नेण्याची सूचना केली. -धर्मराज रायबोले, पशुसंवर्धन अधिकारी, माथेरान
पोलिसांमुळे वाचले भेकराचे पिल्लू
By admin | Published: January 19, 2017 5:45 AM