परिंचे : मांढर (ता. पुरंदर) येथील नवसाला पावणारी, मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी, जागृत देवस्थान व परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेली श्री काळुबाई देवीची यात्रा ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’ या जयघोषात सुरू झाली. यानिमित्त मांढर पंचक्रोशीतील आणि विविध जिल्ह्यातून आलेल्या भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यात्रेच्या निमित्ताने मांढर ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आह़ेत. समस्त ग्रामस्थ मंडळ मांढर (ता. पुरंदर) यांच्या वतीने यंदादेखील काळुबाई देवीच्या भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या निमित्ताने बुधवार दि. ११ रोजी रात्री १० वाजता काळुबाई पालखीची ढोल ताशा, झांज, सनईच्या गजरात सर्व ग्रामस्थ, महिला यांच्या समवेत गावातून गुलाल उधळत भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावच्या चौकात गेल्यानंतर त्याठिकाणी ग्रामस्थांची मिटींग घेण्यात येऊन पंंचकमिटी नेमून व प्रत्येकावर यात्रेची जबाबदारी सोपविण्यात आली. नंतर रात्री १२ वाजता देवीची काठी ढोल ताशाच्या गजरात ग्रामस्थ नीरा नदी (राजापूर, ता. भोर) येथे स्नान करण्यासाठी नेल्या. येताना भोंगवली ग्रामस्थांनी काठीचे स्वागत करून छबीना सादर केला . दुपारी १२ वाजता काळुबाई देवीच्या डोंगरावर मंदिराभोवती ढोल ताशा, झांज, सनईच्या गजरात गुलाल उधळत मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या गेल्या. त्यानंतर व १२ ते ३ श्रींची पूजा केली गेली. त्यानंतर मांढर पंचक्रोशीतील व सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथून आलेल्या भाविकांनी डोंगरावर देवीला नैवेद्य देऊन सुवासिनी जेवू घातल्या. यात्रे निमित्ताने काळुबाई मंदिर परिसरात प्रसाद, खेळणी, मिठाईची अनेक दुकाने सजली होती. रात्री ९ ते १ नवस फेडण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने रात्री १ ते ६ वाजेपर्यंत ढोल लेझीमचा कार्यक्रम आयोजित करून कै. अंकुश यदु पोमण यांचे स्मरणार्थ मच्छिंद्र अंकुश पोमण यांच्या वतीने प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख बक्षिसे तसेच संघास ग्रामस्थ मंडळ मांढर यांच्या वतीने प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. (वार्ताहर) शुक्रवारी ७ ते १० वा. देवीची मिरवणूक होईल. सकाळी १० ते ४ व रात्री १० ते १२.३० वाजेपर्यंत वगसम्राट कवी मास्टर तुकाराम अहिरेकर यांच्या आश्रयाखालील मा. प्रकाश अहिरेकर सह मा. नीलेशकुमार अहिरेकर लोकनाट्य तमाशा मंडळ नारायणगाव यांचा करमणुकीचा कार्यक्रम व दुपारी ४ वाजता निकाली कुस्त्याचा जंगी आखाडा होणार आहे. देवीच्या दर्शनासाठी पौष पौर्णिमेपासून पुढे पंधरा दिवस गर्दी असते.
‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात यात्रेला सुरुवात
By admin | Published: January 13, 2017 2:12 AM