- डिप्पी वांकाणी, मुंबई ७ सप्टेंबर रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यापासून इंद्राणी मुखर्जीने निद्रानाश आणि भोवळ येत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे जे.जे. रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञांनी तिला झोपेच्या गोळ्या आणि तणावमुक्तीच्या गोळ्या देण्यास प्रारंभ केला होता. या प्रकरणाची चौकशी करणारे आय.जी. (कारागृह) बी.के. सिंग यांनी हा गौप्यस्फोट केला.घडलेल्या घटनेचा तपशील देताना सिंग म्हणाले की, शुक्रवारीही इंद्राणी पहाटे ५ वाजता उठली. उठून गीतापठण करीत असतानाच तिने भोवळ येत असल्याची तक्रार केली. त्या वेळी कारागृहात असलेले डॉ. केळणीकर आणि डॉ. खान यांनी तिची तपासणी केली. तिची प्रकृती ढासळल्यानंतर कारागृहाचे मानद फिजिशियन डॉ. वकार शेख यांना पाचारण करण्यात आले. हे सर्व डॉक्टर सकाळी ११ वाजेपर्यंत इंद्राणीसोबत होते. त्यानंतर तिची प्रकृती आणखी खराब झाल्याने तिला जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले.इंद्राणीने निद्रानाश आणि भोवळ येत असल्याची तक्रार केल्यानंतरच कारागृहात जे.जे. रुग्णालयाच्या व्हिजिटिंग मनोविकारतज्ज्ञ डॉ. सारिका दाक्षीकर यांना पाचारण करण्यात आले होते. डॉ. दाक्षीकर यांनीच इंद्राणीला झोपेच्या आणि तणावमुक्तीच्या गोळ्या दिल्या होत्या. या गोळ्या तिला दिवसातून दोन वेळा देण्यात येत होत्या. कैद्याला मानसिक रोगविषयक औषध द्यायचे असेल, तर नर्सिंग वॉर्डन कैद्याला तशी आठवण करून देतो. रात्री ११च्या सुमारास कारागृह अधिकाऱ्यांच्या कार्यालयात औषध दिले जाते. जेव्हा कैद्याला कोठडीबाहेर आणण्याची परवानगी मिळत नाही, तेव्हा वॉर्डन स्वत: बराकीत जाऊन कैद्याला औषधांची आठवण करून देतो. कारागृहात अन्य सहा महिला कैद्यांवरही सध्या हेच उपचार सुरू आहेत. इंद्राणीला १४ दिवसांच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. तो कोर्स २६ सप्टेंबर रोजीच संपला होता. कारागृहातील पद्धतीनुसार काम केले की नाही, याची चौकशी करीत आहोत. त्या वॉर्डात इंद्राणीसोबत असलेल्या अन्य कैद्यांचीही जबानी घेण्यात येत आहे. कामाच्या ठरलेल्या प्रक्रियेत कुठे ढिसाळपणा झाला का? याचा तपास सुरू आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत इंद्राणी सामान्य होती आणि अन्य कैद्यांना तिने तिचे जेवणही दिले होते, असेही ते म्हणाले. इंद्राणीच्या आईचा मृत्यू झाल्याची बातमी कारागृह कर्मचाऱ्यांनी तिला दिली होती का? असे विचारले असता ते म्हणाले की, आम्ही अधिकृतरीत्या तिला तशी माहिती दिली नव्हती. कदाचित वृत्तपत्रांतून तिला तसे कळले असावे. कारागृहात कैद्यांसाठी वृत्तपत्र घेतले जाते. डॉक्टरांकडे असलेल्या गोळ्यांच्या साठ्याची आणि त्यापैकी कोणती गोळी इंद्राणीपर्यंत पोहोचली होती का? याची आम्ही चौकशी करीत आहोत, असेही सिंग यांनी सांगितले.२६ सप्टेंबरला संपला गोळ्यांचा कोर्सफॉरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरीचे उपसंचालक नितीन चुटके म्हणाले की, एखादी व्यक्ती अल्कोहोलिक किंवा अन्य मानसिक उपचाराशी संबंधित औषध घेते तेव्हा ती आधी पोटात जातात. तेथे ती रक्तात मिसळतात, शेवटी ती लघवी व शौचाद्वारे बाहेर पडतात. त्यामुळे एखाद्याने काही सेवन केले आहे की नाही, हे शोधण्यास या चाचण्या घेतल्या जातात. इंद्राणीने तणावमुक्तीच्या गोळ्यांचे अति सेवन करण्याची शक्यता निकाली निघाल्याने इंद्राणीची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली हे शोधून काढण्याची जबाबदारी आता डॉक्टरांवर आहे. त्यातच तणावमुक्तीच्या गोळ्यांचा कोर्स २६ सप्टेंबर रोजीच संपला होता. त्यामुळे याबाबत कारागृह अधिकारीच काय ते सांगू शकतील.कारागृहात आल्यापासून इंद्राणी करत होती गीतापठणकारागृहात आल्यापासून इंद्राणी गीतापठण करीत आहे. शुक्रवारी सकाळीही ती गीतापठण करीत होती. त्यानंतर तिची प्रकृती ढासळली. तिला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती कारागृहात असताना कारागृहाच्या कर्मचाऱ्यांकडून कुठला ढिसाळपणा झाला का? त्यातून तिची प्रकृती ढासळली का? यासह अन्य सर्व पैलूंचा तपास सुरू आहे. या साऱ्या तपासाचा अहवाल तीन ते चार दिवसांत सादर करण्यात येणार असल्याचे आय.जी.(कारागृह) बी.के. सिंग यांनी सांगितले.
डॉक्टरांनीच दिल्या गोळ्या
By admin | Published: October 04, 2015 2:46 AM