ऑनलाइन लोकमतइस्लामपूर, दि. २५ : भारतीय वायुदलाचे ३0 अधिकारी असणारे ए-एन-३२ विमान गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असून, या विमानातील एक वैमानिक कुणाल राजेंद्र बारपटे (वय २९) वाळवा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील विठ्ठलवाडीचे मूळ रहिवासी आहेत. बेपत्ता विमानात बारपटे असल्याचे समजल्यापासून विठ्ठलवाडीचे ग्रामस्थ चिंतेत असून, बारपटे व त्यांचे सहकारी सुखरूप राहावेत, अशी प्रार्थना ते करीत आहेत.
महाविद्यालयीन जीवनापासूनच लष्करी सेवेचा ध्यास घेणारे कुणाल २00८ मध्ये भारतीय वायुदलात वैमानिक म्हणून रुजू झाले. कामेरीपासून जवळच असणारे हजार लोकवस्तीचे विठ्ठलवाडी गाव स्वातंत्र्य चळवळीपासून प्रसिध्द आहे. त्याच गावाची नाळ असणारे कुणाल लष्करी सेवेत जाण्यासाठी ध्येयवेडे बनले होते. आजोबा भीमराव रामचंद्र बारपटे पोलिस सेवेत होते. त्यामुळे गावाकडची शेतीवाडी बघत त्यांनी पुण्यामध्येच वास्तव्य केले. त्यांना कुणालचे वडील राजेंद्र आणि पुतणे विलास अशी दोन मुले. त्यातील विलास शिक्षणानंतर शेतीवाडी आणि पोल्ट्री व्यवसायानिमित्त विठ्ठलवाडीला परतले.
राजेंद्र बारपटे यांना कुणाल व सत्येंद्र अशी दोन मुले आहेत. ते पुण्यात रोड ट्रान्स्पोर्ट कंपनीत सेवेत होते. कुणाल यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झाले. हे कुटुंब निगडी परिसरात वास्तव्यास आहे. कुणाल यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी वायुदलाच्या अॅकॅडमीत प्रवेश घेतला. हैदराबाद आणि सिकंदराबाद शहरांदरम्यानच्या दुंडीगुल येथे त्यांचे वैमानिकाचे शिक्षण झाले. २00८ मध्ये ते वायुदलाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर आसाम राज्यातील वायुदलाच्या जोहराट तळावर त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यांचा लहान भाऊ सत्येंद्र आॅस्ट्रीयातील कोपेनबर्ग येथे उच्च शिक्षण घेत आहे.
वैमानिक बनलेले कुणाल मोठा मित्रपरिवार असलेले मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहे. ते सुटीवर येतील त्यावेळी आम्ही त्यांना भेटतो, अशी माहिती त्यांचे शेजारी कुशल वीरकर यांनी दिली. राजेंद्र बारपटे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय सध्या कुणाल यांच्या परतीकडे डोळे लावून बसले आहेत, तर इकडे विठ्ठलवाडीतही ग्रामस्थ, ते सुखरूप राहावेत यासाठी प्रार्थना करीत आहेत.भविष्यात असा प्रसंग भारतीय वायुदलाच्या इतर अधिकाऱ्यांवर ओढवू नये यासाठी मोदी सरकारने चांगला दर्जा आणि गुणवत्तेची नवीन विमाने खरेदी करावीत. तसेच रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलासाठी उपयुक्त आहेत, असे सांगून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे.- राजेंद्र बारपटे, वैमानिक कुणाल यांचे वडील.भारतीय वायुदलाचे ए. एन.—३२ हे विमान बेपत्ता झाल्यापासून हवाई दलाकडून कोणते प्रयत्न सुरू आहेत, याची कुणाल यांच्या नातेवाईकांनाअद्याप कसलीही माहिती दिली गेलेली नाही. तिकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मात्र त्यांच्या प्रदेशातील वैमानिकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर देत आहेत. महाराष्ट्रातील वायुदलाच्या अधिकाऱ्यांबाबत अशी दखल कोणीही घेतलेली नाही.- विलास बारपटे, कुणाल यांचे चुलते, विठ्ठलवाडी.आईचे अश्रू थांबेनात...वैमानिक कुणाल यांची आई अश्रू ढाळत आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. दूरचित्रवाणीवरील बातम्या आणि हातातील मोबाईलकडे त्या डोळे लावून बसल्या आहेत. वडील राजेंद्र माहिती तंत्रज्ञानाचा वापर करीत आपल्यापरीने इंटरनेटवर कुणालला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.