पिंपरी : स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवडचा समावेश हुकला असला, तरी नागरिकांना स्मार्ट सेवा देण्यासाठी राज्य सरकारने ‘डिजीटल बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर’ या योजनेमध्ये शहराचा समावेश झाला आहे. या योजनेसाठी नागपूरनंतर निवड झालेले पिंपरी-चिंचवड हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे ठरणार आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्मार्ट सिटीत राजकारण झाल्याने पिंपरी-चिंचवडचे स्मार्ट सिटीचे स्वप्न अपूर्ण राहिले. आता स्मार्ट सिटीची शक्यता मावळल्यात जमा आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या धर्तीवर डिजीटल बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर ही योजना राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्या संदर्भातील आराखडा तयार करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. याविषयीची माहिती देताना आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘शहरातील सेवा स्मार्ट करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटीच्या धर्तीवर राज्य सरकारची ही योजना आहे. या संदर्भातील बैठक नुकतीच झाली. त्यात शहराचा डीपीआर तयार करण्याचे काम एका खासगी संस्थेला दिले आहे. या संदर्भातील आराखडा सभेसमोर ठेवून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविणार आहे. त्यानुसार त्यासाठी अपेक्षित असणारा खर्च किती होईल. महापालिकेचा, राज्य सरकारबाबत निधीची शेअर किती असेल, याबाबत बोलणे शक्य होणार आहे.’’(प्रतिनिधी)आयटीसंदर्भातील सेवांचे सक्षमीकरण‘‘माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनाचा आराखड्यात समावेश असणार आहे. त्यात पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, विविध कर भरणे, शहर वायफाय करणे आदी सेवांचा समावेश असणार आहे. आयटी संदर्भातील सेवांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे, असे वाघमारे म्हणाले.निधीबाबत निश्चित धोरण नाहीवाघमारे म्हणाले, ‘‘या योजनेसाठी निधीचा हिस्सा किती, याबाबत माहिती देणे अवघड आहे. आराखडा तयार करून तो सरकारला सादर केल्यानंतर राज्य सरकारचा हिस्सा किती, यावर विचार होणार आहे. त्याचबरोबर पीपीपी तत्त्वावरही या प्रकल्प राबविण्यासाठी विचार केला जाणार आहे. ही योजना राज्य सरकारची असल्याने केंद्राकडून निधी मिळणार नाही. ’’
‘डिजीटल’ योजनेत पिंपरी-चिंचवड
By admin | Published: July 15, 2016 12:15 AM