ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 22 - उत्तर प्रदेशमधील विविध ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर मायक्रोचिप बसवुन रिमोट कंट्रोलद्वारे पेट्रोल भरण्याची यंत्रणा नियंत्रित करून ग्राहकांचे पाच ते दहा टक्के पेट्रोल हडप करीत त्यातून कोट्यवधी रूपयाची माया पंप चालकांना मिळवुन देणाºया दोन भामट्यांना उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने आकुर्डी व ठाणे येथून अटक केली. उत्तरप्रदेशमधील घोटाळेबाज पिंपरी चिंचवडमध्ये आढळून एकच खळबळ उडाली. गुन्ह्यात वापरले जाणारे साहित्य रिमोट कंट्रोल, मायक़्रो चिप, आरएक्स रिसिव्हर,लॅपटॉप असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश मनोहर नाईक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी दुपारी 2 वाजता आकुर्डी, जय गणेश व्हिजन येथील व्हिजिल सिस्टीम नावाच्या दुकानातूनच अटक केली . त्याच्याकडून पोलिसांनी १७७ रिमोट कंट्रोल, १८९ आर.एक्स रिसीव्हर,५० रिमोट सेल, एक लॅपटॉप जप्त केले. अविनाश या दुकानात इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कामाला होता. नवीन इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बनविण्यात त्याचा हातखंडा होता. अनेक नवनवीन प्रयोग तो करीत असे. गेल्या काही दिवसांत नाईक याच्या राहणीमानात खूप बदल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
व्हिजिल सिस्टीम या दुकानाचे मालक जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, अविनाश नाईक हा काही वर्षांपासून आपल्या दुकानात कामाला होता. तो सर्व तांत्रिक कामे बघायचा, परंतू अशा प्रकारच्या गैरकृत्यांत सहभागी असेल, याची आपल्याला पुसटशीही कल्पना नव्हती.आपल्या दुकानातील कर्मचाºयावर पोलिसांनी कारवाई केली, हे धक्कादायक वाटले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने ठाणे येथे अशीच कारवाई करुन विवेक हरिशचंद्र शेटे याला अटक केली आहे. त्याच्याकडून ११० मायक्रोचीप, २१ आर.एक्स रिसीव्हर, २४ रिमोट कंट्रोल, १४ डिसप्ले बोर्ड, ३ पल्सर एल अॅन्ड टी, १ पल्सर निडको, लॅपटॉप, सॉफ्टवेअर असे साहित्य जप्त केले आहे.
ग्राहकांनी पेट्रोलसाठी पैसे मोजले,त्यापेक्षा पाच ते दहा टक्के कमी पेट्रोल देऊन त्यांची फसवणूक करण्याचे लखनौतील पेट्रोलपंपांवरील रॅकेट उत्तर प्रदेश पोलिसांनी नुकतेच उघडकीस आणले आहे. पेट्रोल देणाºया यंत्रात इलेक्ट्रॉनिक चिप बसवून लखनौ शहरातील पेट्रोलपंपांचे चालक ही फसवणूक करत असल्याचे राज्य पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) पथकाच्या तपासणीत आढळले.
पेट्रोलपंप चालकांच्या संगनमताने घोटाळा
लखनौ येथील राजेंद्र नावाच्या इलेक्ट्रिशियनने अनेक पेट्रोलपंपांना या चिप विकल्या असल्याचा एसटीएफच्या अधिकाºयांना संशय होता.त्यांनी राजेंद्रला अटक केली. राजेंद्र अनेक वर्षे पेट्रोलपंपांवर काम करत होता, असे एसटीएफच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी दिल्लीतील काही लोकांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला ही चिप व तिच्या फ्युएल डिस्पेन्सिंग मशीन मधील वापराबाबत माहिती मिळाल्याचे राजेंद्रने त्यांना सांगितले. चिप बसवलेल्या अनेक पेट्रोलपंपांची नावे त्याने सांगितली. ही चिप एका रिमोट कंट्रोल उपकरणाच्या साहाय्याने वापरता येत होती. याची खातरजमा करण्यासाठी तेल कंपन्यांच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत एसटीएफने केलेल्या तपासणीत, संबंधित पेट्रोलपंपांवर यंत्रांमधून ५ ते १० टक्के कमी पेट्रोल दिले जात असल्याचे निदर्शनास आले. तेथील वितरक, व्यवस्थापक, रोखपाल यांच्याकडून १५ इलेक्ट्रॉनिक चिप आणि २९ रिमोट कंट्रोल उपकरणे जप्त करण्यात आली होती. पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारे चिप बसवल्या असल्याची शक्यता असल्याने त्याचा शोध घेतला जणार आहे.