पिंपरी : उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे युवक-युवतींच्या बेपत्ता होण्याचेही प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दिवसाआड बेपत्ता होण्याची तक्रार दाखल होत असून, गेल्या पाच महिन्यांत परिमंडळ तीनच्या हद्दीतून तब्बल १०० तरुण-तरुणी बेपत्ता झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ३० तरुण आणि ७० तरुणींचा समावेश आहे.गेल्या काही वर्षांत येथील उद्योगनगरीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने, रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी राज्यासह इतर राज्यांतीलही नागरिक शहरात स्थायिक होत आहेत. त्यामुळे शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येतून बेपत्ता होणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. विशेष म्हणजे यामध्ये युवक-युवतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने पालकांसह पोलिसांच्याही चिंतेचा विषय झालेला आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ तीनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:शृंगी, हिंंजवडी, सांगवी, वाकड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून या वर्षी जानेवारी ते मेअखेर १०० जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये ३० तरुण व ७० तरुणींचा समावेश आहे. या ३०पैकी २४ तरुणांचा शोध लागला असून, ६ जणांचा तपास सुरू आहे. तर ७० तरुणींपैकी ६० जणींचा तपास लागला असून, उर्वरित १० जणांचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. तसेच या जून महिन्यातही प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता होण्याच्या तक्रारी दाखल असून, त्यांची आकडेवारी घेण्याचे काम सुरू असल्याचे ठाणे अंमलदारांनी सांगितले.मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबरअखेर परिमंडळ तीनच्या हद्दीतून २१२ तरुण-तरुणी बेपत्ता झाले असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. यामध्ये ६३ तरुण आणि १४९ तरुणींचा समावेश आहे. या ६३ पैकी ५८ जणांचा तपास लागला असून, उर्वरित ५ जणांचा वर्ष उलटूनही तपास लागलेला नाही. तर १४९ पैकी १२८ तरुणींचा तपास लागला असून, त्या घरीदेखील परतल्या आहेत. मात्र, २१ तरुणींचा शोध अद्यापही सुरूच आहे. दरम्यान, या बेपत्ता झालेल्यांमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींचा समावेश असून, १६ वर्षांच्या आतील बेपत्ता झालेल्या संबंधी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, काही दिवसांनंतर हे तरुण-तरुणी घरीदेखील परततात. मात्र, पालकांकडून माहिती दिली जात नाही. तरी पालकांनी आपला मुलगा घरी आल्यावर ताबडतोब पोलिसांना कळविणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांतर्फे दर वर्षी आॅपरेशन मुस्कान ही शोध मोहीम राबवली जाते. (प्रतिनिधी)पोलीस दप्तरी बेपत्ता होण्याची कारणे मुलगा किंवा मुलगी घरी न परतल्यावर बहुतांश पालक पोलीस तक्रार नोंदवितात. बेपत्ता होण्यामागे त्यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, घरात भांडण होऊन निघून जाणे, व्यसनाच्या आहारी गेल्याने घर सोडणे, मानसिक आजार असल्याने घरातून निघून जाणे अशा तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी प्रेमप्रकरणातून घर सोडल्याच्या आहेत, तर अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारींचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणावर आहे.
पिंपरी-चिंचवडनगरीत तरुण-तरूणी होताहेत ‘सैराट’
By admin | Published: June 28, 2016 1:43 AM