ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ९ - आगामी ८९ वं मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी पुण्यात केली. डी वाय पाटील संस्थेला संमेलनाचे यजमानपद देण्यात आले आहे.
घुमानमधील साहित्य संमेलन पार पडल्यानंतर ८९ वं साहित्य संमेलन कुठे भरणार याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. सुमारे ११ ठिकाणांहून संमेलनासाठी निमंत्रणे आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना अनोखी भेट देण्याच्या हेतूने साहित्य संमेलनाचा योग बारामतीला जुळून येण्यासाठी साहित्य परिषदेची बारामती शाखा ‘गुडघ्याला बाशिंग’ लावून बसली होती. मात्र युवा साहित्य संमेलनासह पवारांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधत नाट्यसंमेलनचा घाटही या ठिकाणी घालण्यात आला होता. त्यामुळे बारामतीचे नाव मागे पडले होते. यात स्पर्धा होती ती प्रामुख्याने पिंपरी - चिंचवड व श्रीगोंद्यामध्ये. रविवारी पुण्यात महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ८९ वं संमेलन पिंपरी चिंचवड येथे घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.