पिंपरी – सध्या देशभरात क्रिकेटचा महासंग्राम वर्ल्डकप २०२३ स्पर्धा चांगलीच रंगली आहे. देशात क्रिकेटचे हजारो चाहते आहेत. त्यात यंदा वर्ल्डकप भारतात होत असल्याने क्रिकेटप्रेमी चाहत्यांसाठी पर्वणीच ठरली आहे. त्यात एका क्रिकेटप्रेमी पोलिसाला वर्ल्डकपनं कोट्यधीश बनवले आहे. क्रिकेट सामन्यात ड्रीम ११ च्या माध्यमातून या पोलिसाने निवडलेल्या टीमला चांगले रॅकिंग मिळाल्याने त्यांनी तब्बल दीड कोटी रुपये जिंकले आहेत.
पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरिक्षक सोमनाथ झेंडे असं त्यांचे नाव आहे. ड्रीम ११ मध्ये अनेक क्रिकेट चाहते त्यांचे नशीब आजमवत असतात. त्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत सोमनाथ झेंडे यांना लॉटरी लागली आहे. ड्रीम ११ मध्ये दीड कोटी रुपयांचे बक्षीस झेंडे यांना मिळाल्याने कुटुंब आणि नातेवाईकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ झेंडे यांना क्रिकेटचे खूप वेड आहे. त्यातूनच गेल्या २-३ महिन्यांपासून झेंडे यांना ऑनलाईन गेमिंगचा नाद लागला. वर्ल्डकपमध्ये खेळाडूंच्या कौशल्याचा अभ्यास करत त्यांनी ड्रीम ११ वर टीम तयार केली. त्यात बांगलादेश आणि इंग्लंड मॅचवेळी त्यांनी तयार केलेली टीम चांगली खेळली आणि तिला चांगले रॅकिंग मिळाले. त्यामुळे ड्रीम ११ च्या माध्यमातून पीएसआय सोमनाथ झेंडे रातोरात कोट्यधीश बनले. त्यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस मिळाले. झेंडे यांना मिळालेल्या या यशामुळे कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. विशेष म्हणजे ड्रीम ११ वर टीम तयार करण्यासाठी सोमनाथ झेंडे यांनी केवळ ४९ रुपये खर्च केले होते. त्यातून ते कोट्यधीश झाले आहेत.
पोलिसांचं आवाहन
वर्ल्डकपमुळे क्रिकेट चाहत्यांसाठी उत्सवाचा वातावरण आहे. त्यातून ऑनलाईन गेमिंगकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळे काही सायबर भामटे याचा फायदा घेऊन आर्थिक फसवणूक करताना दिसतात. क्रिकेट सामन्यांवर पैसे लावून, टीम लावणारे अनेक App आहेत. या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात तरुण अडकतात. त्यामुळे अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.