लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महानगरपालिकेने पिंपरी सांडस येथील वन जमिनीच्या क्षेत्रामध्ये कचरा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा कचरा प्रकल्प होऊ देणार नाही, असा ठराव शिवसेनेचे सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी मांडला. या ठरावाला इतर सर्वच सदस्यांनी अनुमोदन दिले. उरुळी देवाची गावातील कचरा डेपोमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दूषित होत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचा कचरा प्रकल्प जिल्ह्यातील कोणत्याही भागात नकोच, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तीर्थस्थान असलेल्या वाडेबोल्हाई परिसरात तर हा कचरा डेपो नको, अशी प्रमुख मागणी आहे. त्यामुळे याला आमचा विरोध असणार असल्याचे सदस्यांनी सांगितले. >तुम्हाला काय करायचे ते करा : देवकाते पंचायत समितींना ४० लाखांपर्यंत सेस निधी येतो. हा निधी नियमित येत नाही. यामुळे सेस निधी वाढवून द्यावा. तसेच सर्व पंचायत समितींना समान निधी द्यावा, अशी मागणी इंदापूर पंचायत समिती सभापती करणसिंह घोलप यांना सर्व सभापतींच्या वतीने सभागृहामध्ये केली. त्या वेळी घोलप यांनी इतर तालुक्यांच्या सभापतींना बोलण्यासाठी सांगितले. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षांना तुम्ही इतर सभापतींच्या वतीने बोलता का, अशी विचारणा केली. मी कधीच दुजाभाव केला नाही. मागणी मांडताना शब्द जपून वापरावा, अशी सूचना केली. त्या वेळी घोलप यांनी इंदापूर तालुक्यातली रुई गावातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर अध्यक्ष कारवाई करणार होते. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती, त्याचे काय झाले. त्यानंतर अध्यक्ष सभापतींवर चिडले. मी योग्यच बोललो. गावचे राजकारण सभागृहात आणू नका. तुम्हाला काय करायचे ते करा, असे आवाहन सभापतींना दिले. त्याच वेळी राष्ट्रवादीचे गटनेते शरद लेंडे यांनी, सभापती तुम्ही इतरांचे नेतृत्व करू नका, तुमच्या प्रश्नातील हेतूबाबत शंका येते. रोहित पवार यांनी अध्यक्षांची बाजू घेतली. राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाल्याने करणसिंह घोलप आपले म्हणणे न मांडता शांत बसले. पुण्यातील कचरा प्रश्न हा प्रदीर्घ काळ चर्चेत राहिलेला आहे मात्र त्यावर सर्वमान्य अशा स्वरुपाचा तोडगा अद्यापपर्यंत निघू शकलेला नाही. पिंपरी सांडसला नेण्याचा पालिकेचा विचार असला तरी त्यालाही विरोध कायम आहे.
पिंपरी सांडसला कचरा येऊ देणार नाही
By admin | Published: July 14, 2017 1:35 AM