पिंपरी : रस्त्यावर बंद पडलेल्या बस तातडीने दुरुस्त करणे, बस रस्त्यावरून हटविण्याची पुरेशी यंत्रणाच ठेकेदारांकडे नाही. परिणामी बंद बसेस तासन् तास रस्त्यातच उभ्या राहत असल्याने वाहनचालकांना सातत्याने वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत पुणे महानगर परिवहन महामंडळाकडूनही (पीएमपी) ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे.पीएमपीने पाच ठेकेदारांमार्फत सुमारे ६५३ बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. तर पीएमपीच्या ताफ्यात सुमारे १२०० बस असून, त्यापैकी ६५० ते ७०० बस प्रत्यक्ष मार्गावर धावतात. पीएमपी व ठेकेदारांच्या बसेस रस्त्यातच बंद पडण्याचे प्रमाण मोठे आहे. पिंपरी-चिंचवडसह पुणे व लगतच्या भागात बस बंद पडतात. शहराच्या मध्यवस्तीत बस बंद पडल्यानंतर काही मिनिटांत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. पीएमपीच्या आकडेवारीनुसार, दर तासाला सुमारे १२ बस बंद पडतात. याचा अर्थ दिवसभरात किमान २०० बस रस्त्यातच बंद पडत असल्याची गंभीर स्थिती आहे. मात्र, या बस दुरुस्त करणे किंवा रस्त्यावरून वर्कशॉपमध्ये घेऊन जाण्याची पुरेशी यंत्रणा नाही. शहरातील पेठांमधील अरुंद मार्ग, मुख्य रस्त्यांवरही अनेकदा बस बंद पडतात. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या बस तासन् तास रस्त्यात उभ्या असतात. (प्रतिनिधी)>व्हॅनचा अभाव : दुरुस्तीस विलंबबंद बस वर्कशॉपमध्ये नेण्यासाठी किंवा जागेवर दुरुस्त करण्यासाठी पीएमपीकडे एकूण १७ व्हॅन आहेत. तर ठेकेदारांकडे प्रत्येकी एकच व्हॅन आहे. पीएमपीतील व्हॅनद्वारे केवळ मालकीच्या बसेसच ओढून नेल्या जातात तर ठेकेदारांकडून त्यांच्या बसेससाठी व्हॅन वापरल्या जातात. मात्र, बंद बसेसचे प्रमाण आणि ठेकेदारांकडे उपलब्ध व्हॅनची संख्या यामध्ये खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे ठेकेदारांकडील बस रस्त्यात बंद पडल्यानंतर ती ओढून नेण्यासाठी खूप वेळ लागतो. बराच काळ बस रस्त्यात उभ्या राहिल्याने वाहतूककोंडी होत असल्याच्या कारणास्तव वाहतूक पोलिसांनी पीएमपी प्रशासनालाही वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्यापही या यंत्रणेत सुधारणा झालेली नाही.बंद बस ओढून नेण्यासाठी प्रत्येक ठेकेदाराकडे एकच व्हॅन आहे. त्यामुळे बंद बस तासन् तास जागेवर उभी असते. पीएमपीची यंत्रणा चांगली आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या बंद बसेस ओढून नेण्याचे किंवा दुरुस्त करण्याचे काम पीएमपी करू शकते. त्याबदल्यात ठेकेदारांनी ठराविक रक्कम पीएमपीला द्यावी. सध्या बस तासभर रस्त्यात बंद पडलेली असल्यास ठेकेदारांना पाचशे रुपयांचा दंड आकारला जातो. हा दंड आता हजाराच्या पटीत वाढविण्याचा प्रस्ताव आहे.- अनंत वाघमारे, महाव्यवस्थापक, पीएमपी
ठेकेदारांकडून पिंपरीकर वेठीस
By admin | Published: January 07, 2017 1:31 AM