पुणे : आर्थिक सक्षमीकरणाच्या कालचक्रात विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. आता तर रिक्षा परवाना मिळवून पुरुषांच्या बरोबरीने या व्यवसायतही आपला ठसा उमटविण्यासाठी पुण्यातील गुलाबी गँग सज्ज झाली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पाच महिला रिक्षाधारकांना परवान्याचे वाटप केले जाणार आहे. त्यांची रिक्षाही काळी-पिवळी न राहता त्यांच्या रिक्षासाठी गुलाबी रंग निश्चित करण्यात आला असून, ही गुलाबी गँग लवकरच पुणेकरांच्या सेवेत धावणार आहे. पुणे शहरात तब्बल ८० हजारांहून अधिक रिक्षा असताना अवघ्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच महिला या व्यवसायात आहेत. त्यातही प्रामुख्याने या महिला प्रवासी वाहतूक करताना फारच कमी दिसतात. मात्र, रिक्षाचालकांच्या खाद्याला खांदा लावून महिलाही प्रवासी सेवेत उतरणार आहेत. परिवहन विभागाच्या आदेशानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने तीन हजार २०८ परवान्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यामध्ये महिलांसाठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. गेले दोन महिने परवाना वाटपाची प्रक्रिया सुरू होती. वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. त्यामुळे पात्र महिला उमेदवारांना मंगळवारपासून परवाना वाटप केले जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितली. राज्य शासनाकडून परवाना देण्यात आल्यानंतर या महिलांसाठीची रिक्षाही आगळीवेगळी असणार आहे. या रिक्षासाठी गुलाबी रंग निश्चित करण्यात आला असून, या महिलाचालकांचा गणवेशही याच रंगाचा असणार आहे. > मुलींना मिळणार थेट नोकरीपुणे : पुणे विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून तब्बल २00 मुलींना थेट नोकरी देऊन आणि खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवून महिला दिन साजरा केला जाणार आहे.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणाचे पुणे विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांनी महिला दिनानिमित्त मंगळवारी (दि. ८) मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंडळाच्या सभागृहात १४ नामवंत कंपन्यांंच्या माध्यमातून नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आले. नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या मुलींना भरतीद्वारे त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. निनाळे म्हणाले, आयटीआय उत्तीर्ण अथवा किमान बारावी उत्तीर्ण असणाऱ्या मुलींना या मेळाव्यात नोकरीची संधी दिली जाणार आहे. याबाबत संबंधित कंपन्यांशी चर्चा झाली असून, त्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पुणेकरांच्या सेवेसाठी धावणार महिला रिक्षाचालकांची गुलाबी गँग..!
By admin | Published: March 08, 2016 1:36 AM