मुंबई : राज्यातील २ लाखाहून अधिक घरांना २०१९ च्या महाराष्ट्र दिनापूर्वी पाइपने स्वयंपाकाचा गॅस मिळणार आहे. पंतप्रधान मोदी २२ नोव्हेंबरला दिल्लीत याचे उद्घाटन करणार आहेत. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.एलपीजी सिलिंडरसाठी लागणाऱ्या गॅसची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने घरांना पाइपने नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळाने निविदेच्या आठ फेºया आतापर्यंत पूर्ण केल्या आहेत. नवव्या फेरीत देशातील ८४ व राज्यातील नऊ जिल्ह्यांचा समावेश होता. त्यामधील एकूण २० लाख ५८ हजार ५४३ घरांना पाइपद्वारे हा गॅस पोहोचविला जाईल. भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व युनिसन एन्वायरो या कंपन्यांना हे कंत्राट मिळाले आहे.भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक राजेंद्र नाटेकर यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी २७० दिवसांत करायची आहे. कंत्राट मिळाल्याच्या दिवसापासून नऊ महिन्यांत किमान १० टक्के घरांमध्ये ही सुविधा देणे बंधनकारक आहे. आता १६० दिवस कंपन्यांच्या हातात आहे. ठरल्यानुसार २ लाख ५ हजार घरांमध्ये हा गॅस पुरवला जाईल.२७० पैकी उरलेले १६० दिवस ३० एप्रिलला पूर्ण होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र दिनाआधी या घरांना पाइपने स्वयंकापाचा गॅस मिळणार आहे. या नऊ जिल्ह्यांमध्ये एकूण ३८१ सीएनजी स्टेशन्ससुद्धा उभे होणार आहेत.रिक्षाचालकांच्या खर्चात होईल बचतस्वयंपाकासाठी नैसर्गिक वायू व वाहनासाठी कंडिशन्स नैसर्गिक वायू (सीएनजी) असा हा संयुक्त प्रकल्प आहे. सीएनजी हे पेट्रोल-डिझेलपेक्षा २० टक्के स्वस्त असल्याने शहरी भागातील रिक्षाचालकाची महिनाकाठी ८ हजार रुपयांची बचत होऊ शकेल.अशीच महिनाकाठी किमान १० टक्के बचत सध्या एलपीजी सिलिंडर वापरणा-या कुटुंबाचीही होईल, असे नाटेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
महाराष्ट्र दिनापूर्वी २ लाख घरांना मिळणार पाइपने गॅस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 2:19 AM