काँग्रेसने राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 12:08 PM2019-03-26T12:08:54+5:302019-03-26T12:20:29+5:30
लोकसभा निडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने आज प्रसिद्ध केली आहे.
नवी दिल्ली/मुंबई - लोकसभा निडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने आज प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्याबरोबरच सुजय विखे पाटील यांच्या भाजपाप्रवेशामुळे टीकेची झोड उठलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचाही काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 11 आणि 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने एकूण 40 स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंह, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंदीया यांचा समावेश आहे. या यादीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही स्थान देण्यात आले आहे. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे यांच्यावर टीक झाली होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्याकडे दुर्लक्ष करून विखेंचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय राज्य पातळीवरील इतर अनेक नेत्यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
Congress party releases list of star campaigners for the first and second phase of #LokSabhaElections2019 from Maharashtra. pic.twitter.com/XcPUzSQDYb
— ANI (@ANI) March 26, 2019