मनोहर कुंभेजकर, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - अरबी समुद्रात ४२ एकरात भराव टाकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या जागेबाबत मच्छीमारांचे राज्य सरकार बरोबर असलेले मतभेद काल रात्री वर्षावर झालेल्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या यशस्वी मध्यस्थी नंतर दूर झाले. त्यामुळे पूर्वी ठरलेले प्रखर आंदोलनाचा निर्णय महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि कफपरेड येथील मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटीने अखेर मागे घेतला अशी माहिती समितीचे मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांबरोबर गेल्या बुधवारी वर्षावर झालेली बैठक निष्फळ झाली होती.काल रात्री उशिरा पावणे अकरा ते मध्यरात्री १२पर्यंत पुन्हा वर्षावर मुख्यमंत्र्यांबरोबर यशस्वी बैठक झाली. या बैठकीला मत्स्यव्यवसाय मंत्री जानकर,आमदार राम कदम, समितीचे कार्याध्यक्ष लिओ कोलासो, किरण कोळी, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील, महेश तांडेल,रमेश मेहेर,मोरेश्वर पाटील,परशुराम मेहेर,लक्ष्मण धनू यांच्यासह मच्छीमारांचे ३५जणांचे शिष्ठमंडळ उपस्थित होते.
या बैठकीत मच्छीमारांच्या मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या अध्य्क्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. तसेच या स्मारकामुळे कफपरेड येथील बाधीत ३५० मच्छीमारांना चारपट नुकसान भरपाई, शिवस्मारक झाल्यावर येथील पर्यटन क्षेत्रात मच्छीमारांसाठी रोजगार,तसेच या क्षेत्रात मच्छीमारांना मासेमारी करण्यास कोणतेही निर्बंध घालण्यात येणार नाहीत,सागरी पोलिस ठाण्यात ८० टक्के नोकऱ्या,राजभवन येथील २०० मीटर परिसरातील मासेमारीसाठी असलेली बंदी येथे संरक्षक भिंत बांधल्या नंतर मागे घेण्यात येईल. तसेच स्मारकासाठी टाकण्यात येणारा भराव कसा कमी करून मासेमारीसाठी अधिक क्षेत्र कसे उपलब्ध करता येईल याचा समिती निर्णय घेईल असे महत्वाचे निर्णय या बैठकीत झाले.
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक भूमिका आणि त्यांनी घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय यामुळे हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती किरण कोळी यांनी दिली.
उद्या या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते होणार आहे,त्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानासमोर मागील लोकसभा निवणुकीपूर्वी आपल्या जाहिरनाम्यात भाजपाने केंद्राच्या कृषीमंत्रालयाकडे असलेले मत्स्यव्यवसाय खाते वेगळे करा. तसेच सागरी मासेमारी कायदा-२०१६ मध्ये पारंपारिक क्षेत्र मच्छीमारांसाठी आरक्षित ठेवा या मच्छीमारांच्या दोन प्रमुख मागण्या मांडण्याची मागणी केली.त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती किरण कोळी यांनी दिली.