उल्हासनगर : सुप्रसिद्ध ‘मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनी’च्या कॅम्प नं. ४, लालचक्की येथील कार्यालयाच्या भिंतीला रविवारी मध्यरात्री भोक पाडून ३० किलो सोने व रोख रक्कम असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. या इमारतीचा वॉचमन फरार असल्याने त्यानेच हा दरोडा टाकल्याचा प्राथमिक अंदाज आहे.‘शंकरकृपा पॅलेस’ इमारतीमध्ये ‘मणप्पुरम गोल्ड’चे कार्यालय आहे. इमारतीचा वॉचमन करण थापा याने कुणालाही न सांगता, स्वत: गावी जाण्यापूर्वी एका अनोळखी इसमाला वॉचमन म्हणून ठेवले होते. इमारतीची साफसफाई व पाणी सोडण्याचे काम हा नवा वॉचमन करीत होता. सोमवारी सकाळी वॉचमनने पाणी सोडले नाही, म्हणून रहिवाशांनी वॉचमनला शोधण्यास सुरुवात केली. मात्र, ‘मणप्पुरम गोल्ड’ कार्यालयाच्या मागील बाजूस असलेली त्याची खोली सताड उघडी होती आणि तेथूनच भिंतीला कटरच्या साहाय्याने मोठे भोक पाडण्यात आल्याचे रहिवाशांना दिसले. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला ही माहिती देण्यात आली.नवीन अनोळखी वॉचमनने, आपल्या खोलीमधून मध्यरात्री मणप्पुरमच्या कार्यालयाच्या भिंतीला भोक पाडले आणि आतील सोने व रोकड लंपास केली, असा प्राथमिक अंदाज असून याबाबत अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे. नेमके सोने व रोकड मिळून नेमका किती ऐवज चोरीला गेला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)ग्राहकांच्या हितालाच प्राधान्यग्राहकांचे हित व त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची सुरक्षा हीच कंपनीची प्राथमिकता आहे, असे ‘मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनी’ने स्पष्ट केले आहे. चोरीला गेलेल्या सोन्याचा विमा उतरवला असल्याने ग्राहकांनी निश्चिंत राहावे. चोरी करणाऱ्यांनी आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पकडले जाऊ नये, याकरिता प्रयत्न केले असले तरीही पुरेसे फुटेज हाती लागले असून ते पोलिसांच्या हवाली केले आहे, असेही या कंपनीने म्हटले आहे.
भिंतीला भगदाड पाडून ३० किलो सोने लुटले
By admin | Published: December 27, 2016 4:32 AM