मनोहर कुंभेजकर/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गावरून थेट गोरेगाव पश्चिमेला जोडणारा मृणाल गोरे उड्डाणपुलाचा दुसरा टप्पा गोरेगाव लिंक रोडपर्यंत विस्तारित करण्याची योजना आता पालिका बासनात गुंडाळण्याच्या तयारीत आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८४० मीटर लांबीच्या या विस्तारित पुलाच्या कामाला १५० कोटी खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यासाठी पालिकेने ८० कोटी रुपये खर्च केले असून, २.३ किमी लांबीच्या या उड्डाणपुलाचे एप्रिल २०१६ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले होते आणि या पुलाला गोरेगावच्या रणरागिणी मृणाल गोरे यांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी होती आणि त्यापूर्वी काही महिने मृणाल गोरे यांच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजपात कलगीतुरा रंगला होता.सदर उड्डाणपूल अंधेरी ते मालाडपर्यंत राहणाऱ्या लाखो नागरिकांना आधारवड ठरत असून, रोज सुमारे २५ हजार वाहने पुलाचा उपयोग करतात. मात्र, पालिकेच्या परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांनी ५ एप्रिलला पालिका आयुक्त अजय मेहता यांना दिलेल्या एका अहवालात, सदर उड्डाणपूल गोरेगाव लिंक रोडला जोडणारा दुसरा टप्पा किफायतशीर नसल्यामुळे सदर योजना रद्द करण्याचे नमूद केले आहे. यावर भाजपाचे प्रभाग क्रमांक ५८ चे नगरसेवक संदीप पटेल यांनी आक्षेप घेतला आहे. पालिका सभागृहात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, या विस्तारित उड्डाणपुलासाठी खांब उभारले असताना आणि भविष्यात वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता, सध्या स्वामी विवेकानंद रोडला जोडणारा पूर्व पश्चिम उड्डाणपूल लिंक रोडपर्यंत विस्तारित करणे गरजेचे आहे. सध्या गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्ग ते लिंक रोड येथील इनआॅरबिट मॉलला जोडणारा सावरकर उड्डाणपूल हा एकमेव उड्डाणपूल असल्यामुळे, येथील वाहतुकीवर मोठा ताण पडतो. त्यातच एमटीएनएल जंक्शनवर या पुलाच्या विस्तारिकरणाचे काम सुरू असल्यामुळे, येथे मोठी वाहतूककोंडी होते. त्यामुळे मृणाल गोरे उड्डाणपूल हा गोरेगाव लिंक रोडपर्यंत विस्तारित करणे हिताचे असल्याचे संदीप पटेल यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी उपायुक्त किरण आचरेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी दुजोरा दिला नाही.
मृणाल गोरे उड्डाणपूल गोरेगाव लिंक रोडला जोडण्याची योजना पालिका बासनात गुंडाळणार
By admin | Published: May 08, 2017 4:51 AM