नागपूर : पंचगंगा नदीतून इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा होतो. मात्र, कोल्हापूर शहरातील सांडपाणी नदीत सोडण्यात येत असल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. याची दखल घेत पंचगंगा नदी शुद्धीकरणासाठी एक आराखडा तयार केला जाईल व त्यासाठी निधी कुठून उपलब्ध करून देता येईल ते पाहू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. इचलकंरजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा व पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाले असून काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी सुरेश हाळवणकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. यासंबंधीचा ६३१ कोटी ८५ लाख रुपयांचा प्रस्ताव राज्यस्तरीय नोडल यंत्रणा तसेच नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित योजनेला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याची मागणी हाळवणकर यांनी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संबंधित प्रस्तावाबाबत काही त्रुटींची पूर्तता करण्यास नगर परिषद प्रशासन संचालनालयातर्फे इचलकरंजी नगर परिषदेस कळविण्यात आले असतानाही नगर परिषदेने त्रुटींची पूर्तता केली नाही. आता नगर परिषदेस त्रुटी दूर करण्यास सांगून राज्य नोडल एजन्सीला संबंधित प्रस्तावास तांत्रिक मंजुरी देण्यास सांगितले जाईल. यानंतर शासनाकडे प्रस्ताव येताच १५ दिवसांच्या आत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. (प्रतिनिधी)
पंचगंगा नदी शुद्धीकरणासाठी आराखडा
By admin | Published: December 23, 2014 12:16 AM