नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी वैमानिकाच्या समयसूचकतेने राष्ट्रपतींच्या विमानाची दुर्घटना टळली. वैमानिकाने या घटनेची तक्रार हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि वायूसेनेकडे केली आहे. सायंकाळी ५.४२ च्या सुमारास राष्ट्रपतींचे विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानासमोर आठ डुक्कर आले. पण वैमानिकाने कार्यक्षमतेचा परिचय देत दुर्घटना टाळली. मनपाच्या शतकोत्तर समारंभाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी वायूसेनेच्या विमानाने नागपूर येथे दाखल झाले. अतिविशेष व्यक्तीच्या विमानासाठी धावपट्टीवर सक्षम सुरक्षा नसल्याचे पाहून वैमानिक नाराज झाल्याची माहिती आहे. विमानतळावर डुकरांची हजेरी विमानासाठी धोक्याची घंटा होती. यापूर्वी लोकमतने धावपट्टीवर प्राण्यांचा वावर असल्याचे वृत्त प्रकाशित केले आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा भिंत तुटली असून काही जागी उंची फारच कमी आहे. याशिवाय आतील भागात दाट झाडे आहेत. यामुळेच काही महिन्यांआधी एकजण भिंत ओलांडून धावपट्टीजवळ आला होता. राष्ट्रपतींच्या हवाई यात्रेसाठी बोर्इंग-७३७ विमानाचा उपयोग करण्यात आला. विमान सुरू असताना जवळील प्राणी टर्बाईन अथवा इंजिन ओढते. त्यामुळे इंजिन बिघडून आग लागण्याची जास्त शक्यता असते. खा. दर्डा यांनी वारंवार वेधले लक्ष अशा प्रकारच्या घटना नागपूर विमानतळावर यापूर्वीही घडल्या आहेत. खा. विजय दर्डा यांनी संसदेत तसेच संसदेच्या नागरी हवाई वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये नागपूर विमानतळावरील सुरक्षेचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता. सर्वोच्च नेत्याच्या आगमनाप्रसंगी अशी घटना घडते, यावरून सामान्य प्रवाशांच्या बाबतीत विमानतळ प्रशासन किती ‘दक्ष’ असेल, याची कल्पना येते.
विमानाची दुर्घटना टळली
By admin | Published: September 16, 2015 2:14 AM