ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 25 - श्रीमलंग गडावर दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र, त्या तुलनेत येथे पुरेशा सोयीसुविधा नसल्यामुळे श्रीमलंग परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विकास करावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, श्रीमलंग परिसर विकासासाठी १० कोटींचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. त्याचप्रमाणे येथे होणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी अडवण्यासाठीही स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्ह्यातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, सुभाष भोईर, शांताराम मोरे, रुपेश म्हात्रे, पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार आदी उपस्थित होते.श्रीमलंग गडाचा समावेश राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकासाच्या ब गटात करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद तसेच वनविभागाकडे अनेक बैठकाही त्यांनी घेतल्या. मात्र, वनविभाग आणि जिल्हा परिषद यांच्या कार्यक्षेत्रातील वादामुळे या परिसराचा विकास रखडला होता.सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत खा. डॉ. शिंदे यांनी यासंदर्भात होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासकीय पातळीवर उदासीनता दाखवली जात असल्याची तक्रार त्यांनी केली. श्रीमलंग गड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे, तसेच येथे पर्यटन विकासालाही भरपूर वाव आहे. या परिसराचा विकास होण्याबरोबरच स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या परिसराच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा सादर करण्याची मागणी त्यांनी केली.या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा परिषद आणि वनविभाग यांनी कार्यक्षेत्राचा बागुलबुवा उभा न करता या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने १० कोटींचा आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच, पावसाचे पाणी अडवण्यासाठीही सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.पाणीटंचाईबाबत खासदारांनी खडसावलेश्रीमलंगगड परिसरात पडणारे पावसाचे पाणी अडवण्याच्या संदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून दाखवल्या जात असलेल्या उदासीनतेबाबतही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या परिसरात भरपूर पाऊस होऊनही दरवर्षी तीव्र पाणीटंचाई भेडसावते. गेल्या वर्षी मी स्वत: १० गावांमधले बंधारे आणि तलावांमधील गाळ काढला. त्यामुळे पाणी साठवण्याची क्षमता लाखो लीटरने वाढली. त्याचवेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या परिसरातील बंधाऱ्यांची डागडुजी, त्यांची उंची वाढवणे, आवश्यक त्या ठिकाणी नव्या बंधाऱ्यांचे बांधकाम यांचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप याबाबत काहीही हालचाल झाली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, या परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असूनही नादुरुस्त बोअर आणि हँडपंपची दुरुस्ती केली जात नाही. येथील काही गावांमध्ये नळपाणी योजना असल्याचे कागदोपत्री दाखवले गेले आहे, प्रत्यक्षात जागेवर नळपाणी योजना अस्तित्वात नाही, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
श्रीमलंग परिसराचा होणार नियोजनबद्ध विकास
By admin | Published: April 25, 2017 4:47 PM