मुंबई - महिला व बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी महिला व बालविकास विभाग नियोजनबद्धरित्या काम करेल, अशी ग्वाही महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. बालदिनानिमित्त महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफच्यावतीने सह्याद्री अतिथीगृहात कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोविड योद्ध्यांच्या सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, युनिसेफच्या बालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरा, मॅक्सवुमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
महिलांच्या कल्याणासाठी खूप काम करणे आवश्यक असून महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी येत्या काळात करायची आहे, असे सांगून ॲड. ठाकूर म्हणाल्या की, महिला, बालके तसेच तृतीयपंथीयांच्या मागे ज्याप्रमाणे शासन उभे आहे त्याचप्रमाणे समाजानेही उभे राहिले पाहिजे. अत्याचारग्रस्त बालके आणि महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. बाल लैंगिक शोषण तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालायचा असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. अशा घटकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विभागाकडून आगामी काळात नियोजनबद्धरित्या काम केले जाईल.
सचिव कुंदन म्हणाल्या, 'बालकांचे कायदेशीर संरक्षण तसेच मानसिक, शारीरिक तंदुरुस्ती साधणे , भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा असून विभागाने त्यादृष्टीने काम सुरू केले आहे. त्यानुसारच ‘जेजेआयएस’ मोड्यूल विकसित करण्यात आले आहे. डॉ. यशोद यांनी सांगितले की, महिला व बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काम करत असताना विविध यंत्रणांशी समन्वयाचे काम आव्हानात्मक असते. त्यासाठी विभागाकडून तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केला जाईल.
ज्युवेनाईल जस्टीस बोर्डसाठी विकसित करण्यात आलेले ज्युवेनाईल जस्टीस इन्फॉर्मेशन सिस्टीम (जेजेआयएस) मोड्यूल विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळासमोर सादर करणे, त्यांना समुपदेशन, पुनर्वसन, आवश्यक मदत आदींच्या अनुषंगाने कार्यवाही, पोलिसांकडे अर्ज पाठविणे, तपास अधिकाऱ्यांनी तपास कार्यवाहीचा तपशील भरणे आदी बाबी यामाध्यमातून यापुढे ऑनलाईन होणार आहेत. या सर्व प्रक्रिया यापूर्वी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून होत असल्यामुळे विलंब लागत होता.
ऑनलाईन यंत्रणेमुळे विधीसंघर्षग्रस्त बालकांची देखरेख आणि या प्रक्रियेचे संनियंत्रण ऑनलाईनरित्या करणे सोपे होणार आहे. तसेच सर्व अद्ययावत डाटा वेळीच उपलब्ध होणार आहे. यावेळी जेजेआयएस मॉड्यूलचे उदघाटन, बाल लैंगिक शोषणाच्या अनुषंगाने बालकांचे लैंगिक शोषण, सुरक्षितता त्यांची-जबाबदारी आपली या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, व्हीसीपीसीसाठी बाल संरक्षणाच्या अनुषंगाने माहितीचा समावेश असलेल्या चित्रफिती, पोस्टर्स आदी साहित्याच्या कीटचे अनावरण यावेळी करण्यात आले.