जितेंद्र कालेकर,
ठाणे- व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चाचे परिणामकारक नियोजन करण्यात आले. तसेच मोर्चाकरिता तयार केलेल्या आचारसंहितेचे आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रचारही करण्यात आला. त्यामुळेच हा सुसूत्रताबद्ध मोर्चा निघाल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या ठाण्यातील स्वयंसेवकांनी लोकमतला दिली. गेल्या महिनाभरापासून या मोर्चाची तयारी केली होती. शहरातील वागळे इस्टेट, नौपाडा, लोकमान्यनगर, कोपरी आदी विभागांमध्ये दरआठवड्याला बैठका घेऊन मोर्चाची रणनीती आखली होती. मोर्चासाठी राज्यस्तरीय मार्गदर्शक तत्त्वे ठरली होती. त्याचे पालन आणि अनुकरण प्रभावीपणे करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपही बनवण्यात आले होते. एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये २५६ सदस्य नोंदवण्याची मर्यादा असल्याने असे शेकडो ग्रुप कार्यरत होते. फेसबुकचाही प्रभावी वापर केल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले. कुठेही कचरा फेकू नये, मोर्चात शिस्त असावी, घोषणा नको, कोणालाही त्रास देऊ नये, अशा अनेक मार्गदर्शक सूचनांची यादी या ग्रुपवरून आपल्या बांधवांना फॉरवर्ड केली जात होती. >‘स्वयंसेवक’ ग्रुपमोर्चातील बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ४० जणांचा ‘स्वयंसेवक’ या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला होता. वरिष्ठ समितीने पोलिसांबरोबर बैठका घेऊन मोर्चाचे नियोजन केले होते. >मोर्चासाठी सहा मुख्य मार्गमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्याकरिता सहा मार्गांचे नियोजन केले होते. पहिला मार्ग- तीनहातनाका, नाईकवाडी. दुसरा- अल्मेडा रोड, ठाणे महापालिका भवन. तिसरा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, एसटी कार्यशाळा, खोपट. चौथा मार्ग- केव्हीला रोड ते सेंट्रल मैदान. पाचवा- कळवा, खारेगाव उड्डाणपूलमार्गे आणि सहावा खारटन रोड मार्ग. या सहा मार्गांची माहिती व नकाशे व्हॉट्सअॅपवरून फॉरवर्ड केले होते. ज्या मार्गाने याल त्याच मार्गाने परत जा, अशी सूचना केली होती.पाठपुरावा करणार- विचारेमराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी हा मुद्दा आपण लोकसभेत उचलून धरणार असल्याचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.