सोलापूर : आषाढी यात्रेवेळी पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येणाºया भाविकांच्या सुविधेसाठी एकादशीदिवशी होणाºया शासकीय महापूजेचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी दिली.
आषाढी यात्रेवेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा केली जाते. या पूजेच्या वेळी मंदिराच्या गाभाºयात किती जण असावेत, याचे काहीच नियोजन नाही. पूजेवेळी गर्दी होत असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा गर्दीवेळी उपस्थित असलेल्यांसाठी आॅक्सिजनचा पुरवठा होतो का, याचा गांभीर्याने अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ही पूजा मध्यरात्री अडीच वाजता होते. या पूजेसाठी व्हीआयपींसोबत किती जणांना मंदिरात प्रवेश द्यावा, याचे काहीच नियम केलेले नाहीत. गेल्या तीन वर्षांत आषाढी वारीचे नियोजन करताना ही बाब निदर्शनाला आली आहे. त्यामुळे मंदिर समितीचे पदाधिकारी व प्रशासनातील प्रमुख घटक यांनी एकत्रितपणे अभ्यास करून कृती आराखडा तयार करण्याबाबत सुचविल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
भाविकांच्या दर्शनाचे नियम मंदिर समिती ठरविते. हा भाग सोडून शासकीय महापूजेवेळचे नियोजन कसे असावे, याबाबत धोरण ठरविण्यासाठी अभ्यासकांचे मत विचारात घेतले जाणार आहे. यासाठी मी स्वत: भागवताचार्य वा. ना. उत्पात यांच्याशी चर्चा केली आहे. अशाच प्रकारे इतर मान्यवरांशी चर्चा करून शासकीय महापूजेबाबत धोरण ठरविण्यात येणार आहे. प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर या धोरणाचा अंमल होणार आहे. शासकीय महापूजेचे एकदा धोरण ठरले की मग त्यादृष्टीने नियोजन करणे प्रशासनाला सोपे जाणार आहे. त्यामुळे दरवर्षी नव्याने होणारी अडचण येणार नाही.
या बाबींचा करा अभ्यास...- मंदिराच्या गाभाºयात उपलब्ध असणारा आॅक्सिजन, एकाचवेळी किती भक्तांना रांगेत सोडावे, महापूजेवेळी छायाचित्र व व्हिडिओची वेगळी यंत्रणा, व्हीआयपींसोबत किती जण असावेत, या पासचे नियोजन वारीच्या आधी एक महिना करण्यात यावे. ऐनवेळी येणाºयांना यात प्राधान्य देता कामा नये. अशी नियमावली तयार झाल्यास मंदिर समिती, जिल्हा प्रशासन व पोलिसांना अंमलबजावणी करणे सोपे जाणार आहे.
तिरुपती, शिर्डीचा करा अभ्यास- महापूजेचे धोरण ठरविण्यासाठी तिरुपती व शिर्डी, शेगाव येथील दर्शन आणि महापूजेच्या वेळी कोणत्या धोरणाचा अवलंब केला जातो, याचा अभ्यास करण्याच्या सूचना मंदिर समितीच्या व्यवस्थापनास दिल्या आहेत. येथील मंदिराच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सुनियोजित दर्शनाकरिता कायमचे धोरण राबविण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले.