ऑनलाइन लोकमत
भिलवडी, दि. 17 - जन्माबरोबर मृत्यूही अटळ आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र मृत्यूनंतर अंत्यसंस्कार आणि रक्षविसर्जनाच्या विधींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी धनगाव (ता. पलूस) येथील साळुंखे परिवाराने धाडसी पाऊल उचलले. रक्षांचे विसर्जन कृष्णा नदीपात्रात न करता, दोन खड्ड्यात रक्षा ठेवून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
धनगावचे माजी उपसरपंच संभाजी साळुंखे यांच्या पत्नी व साहित्यभूषण म. भा. भोसले सार्वजनिक वाचनालयाच्या संचालिका सौ. सरिता साळुंखे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. केवळ दहा वर्षांचा संसार आणि पहिलीत शिकणारा मुलगा पदरी. सरिता यांच्या मृत्यूमुळे या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कृष्णेच्या पात्रात रक्षाविसर्जन केल्याने होणारे जलप्रदूषण रोखावे, यासाठी रक्षा नदीत विसर्जित न करण्याबाबत गावातील तरुण मंडळींनी पुढाकार घेतला. संभाजी साळुंखे व त्यांच्या परिवाराने सहमती दर्शविली. हा निर्णय ज्येष्ठांच्या कानावर घातला. या परिसरात अशा पद्धतीने प्रथमच रक्षाविसर्जन होत आहे, ही गोष्ट समाज कितपत स्वीकारेल, याबाबत शंका होती. पण परंपरेच्या अंधानुकरणापेक्षाही जलप्रदूषण रोखणे महत्त्वाचे असल्याचा विचार मराठा समाजाने केला. धनगाव ग्रामपंचायतीने वृक्षांची उपलब्धता करून दिली. दोन खड्ड्यांत रक्षा ठेवून त्यात दोन वृक्षांची लागवड करून, पसायदान म्हणण्यात आले.
सातत्य ठेवणार
धनगावमधील नागरिक आता अशाच पद्धतीने कृष्णा नदीघाटावर वृक्षारोपण करून, जलप्रदूषण रोखून पर्यावरणाचा समतोल राखण्यात सातत्य ठेवणार आहेत.
मरावे परि वृक्षरूपी उरावे...
पत्नीची आठवण वृक्षाच्या माध्यमातून चिरंतन टिकविण्यासाठी हा निर्णय घेतला असून, या झाडांचे संगोपनही परिवाराच्यावतीने करण्यात येईल.
- संभाजी साळुंखे, धनगाव