मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीचे सर्वांनाच आकर्षण वाटते. मुंबई प्रेक्षणीय स्थळांमुळे आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांमुळेही प्रसिद्ध आहे. रोज शेकडो पर्यटक या प्रेक्षणीय स्थळांना आणि ऐतिहासिक वास्तूंना भेटी देत असतात. नागरिकांनी आणि पर्यटकांनी या स्थळांविषयीची इत्थंभूत माहिती मिळावी, म्हणून या ठिकाणी माहिती फलक लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.महापालिकेत झालेल्या बैठकीत आयुक्त अजय मेहता यांनी पर्यटन स्थळांवर माहिती फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील पर्यटनाला नक्कीच फायदा होईल. स्मार्ट सिटी म्हणून मुंबईचा विकास व्हावा, म्हणून सध्या प्लॅनिंग सुरू आहे. अन्य राज्यात आणि परदेशातील प्रेक्षणीय स्थळांवर अथवा ऐतिहासिक वास्तूंना भेट दिल्यावर त्या ठिकाणी लावलेल्या फलकांवर त्या स्थळांची माहिती लिहिलेली असते, पण मुंबईत पर्यटक अथवा नागरिक फिरतात, तेव्हा त्यांना त्या स्थळाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी गाइडची आवश्यकता लागते. मुंबईतील गेट वे आॅफ इंडिया, कमला नेहरू पार्क, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राजाबाई टॉवर, टाउन हॉल, छोटा काश्मीर, जुहू चौपाटी, नरिमन पॉइंट, नेहरु विज्ञान केंद्र, नेहरु तारांगण अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते, पण अनेक ठिकाणांवर माहिती फलक नसल्याने, त्या स्थळाविषयी पर्यटक, नागरिकांना माहिती मिळत नाही. ऐतिहासिक वास्तूंवरही हे फलक लावण्यात येणार आहेत. नावासह माहिती फलक लावल्यामुळे त्याचा पर्यटकांना फायदा होणार आहे. यापुढे मुंबईतील पर्यटन आणि ऐतिहासिक वास्तू पाहताना त्याचा इतिहास व महत्त्व समजणार आहे. (प्रतिनिधी)
पर्यटनस्थळांवर लागणार फलक
By admin | Published: November 07, 2016 6:39 AM