अतुल जयस्वाल अकोला : कोरोना संसर्गावर ‘प्लाझ्मा थेरपी’ उपयुक्त ठरत असून, या उपचार पद्धतीसाठी आवश्यक असलेला प्लाझ्मा दान करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘प्लॅटिना प्रोजेक्ट’अंतर्गत प्रत्येक प्लाझ्मा दात्याला ५०० ऐवजी आता २००० रुपये देण्यात येणार आहेत. तसे परिपत्रक १७ आॅगस्ट रोजी काढले आहे. यापूर्वी प्लाझ्मा दान केलेल्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाकडून यापूर्वी ५०० रुपये प्रति डोनर अशी तरतूद करण्यात आली होती; परंतु राज्यभरात कुठेही याची अंमलबजावणी झाली नव्हती. प्लाझ्मा दान करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे दात्याचा संपूर्ण दिवस खर्ची पडतो. यामुळे प्लाझ्मा दानासाठी कोणी फारसे पुढे येत नसल्याचे वास्तव आहे. प्लाझ्मा दान करणाºयाला त्याने खर्च केलेले किमान प्रवास भाडे, जेवन व त्याच्या बुडालेल्या रोजगाराचा मोबदला मिळावा, यासाठी आता प्रत्येक दात्याला २००० रुपये देण्यात येणार आहेत. राज्यातील १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्लाझ्मा युनिट स्थापन करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.२७३ दात्यांकडून ७७५ युनिट प्लाझ्मा संकलीतप्लॅटिना प्रोजेक्टअंतर्गत १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २७३ रक्तदात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. २३ आॅगस्टपर्यंत या रक्तदात्यांनी ७७५ युनिट प्लाझ्मा दान केल्याची नोंद आहे.