मुंबई: राज्यात गेल्या पाच वर्षांत जनजागृतीमुळे ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढला आहे. रक्ताची कमतरता भासत नसली तरीही रक्तघटकांची कमतरता आहे. त्यामुळेच रक्तघटक वेगळे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर पुण्यात ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लाण्ट’ उभारला जाणार आहे. देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. राज्यात इम्युनोग्लोबिन, अल्गोमीन, फॅक्टर ८ आणि ९ यांची गरज असते. पण, प्लाझ्मामधील हे घटक देशात वेगळे करणे शक्य होत नाही. त्यामुळे गरजेनुसार हे घटक परदेशातून मागवावे लागतात. त्यामुळे राज्यातच ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लाण्ट’ उभारण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. पुण्यात हा प्लाण्ट उभा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. गिरीष चौधरी यांनी दिली. सध्या राज्यात जिल्हा स्तरावर ११ ठिकाणी रक्तघटक विलगीकरण केंद्र सुरू आहेत. राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत २०७ ग्रामीण रुग्णालयात रक्त साठवण केंद्र आहेत. राज्यात ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख इतकी आहे. अंदाजे लोकसंख्येच्या १ टक्का रक्ताची आवश्यकता असते. त्यामुळे राज्यात ११ लाख २३ हजार रक्त पिशव्यांची आवश्यकता आहे. पण, २०१५ साली १५ लाख ६६ हजार रक्तपिशव्या संकलित झाल्या. राज्यात सध्या रक्ताची गरज पूर्ण होत आहे. फक्त दिवाळी आणि उन्हाळ््याच्या सुटीत महाविद्यालये बंद असल्याने रक्ताची कमतरता भासते. पण, अशावेळी धार्मिक संघटनांना रक्तदानाचे आवाहन करण्यात येते, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)मेट्रो रक्तपेढ्या राज्यात रक्त आणि रक्तघटकांचा पुरवठा सहज आणि सुलभरित्या करण्यासाठी राज्य शासनाने १० ठिकाणी ‘स्टेट आॅफ आर्ट’ रक्तपेढ्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा रुग्णालय, ठाणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, परभणी, जळगाव, सातारा आणि पुणे येथे स्वयंचलित मशीनद्वारे ब्लड गु्रपिंग, क्रॉस मॅचिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एलायझा टेस्टिंग करण्यात येणार आहे. राज्यात एकूण ३१८ रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी मुंबईत ८० रक्तपेढ्या आहेत. राज्यातील एकूण रक्तपेढ्यांपैकी ४८ टक्के रक्तपेढ्या मुंबई, ठाणे, पुणे परिसरात आहेत. ग्रामीण भागात १४५ रक्त साठवणूक केंद्र आहेत.
राज्यात ‘प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन प्लांट’
By admin | Published: June 14, 2016 3:44 AM