पुणे : दुधाच्या प्लास्टिक पिशव्या कोणी गोळा करायच्या यावरुन तिढा निर्माण झाल्याने दुधाच्या पिशव्यांचे उत्पादन बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक पिशवी गोळा करुन त्यावर प्रक्रिया करण्याचा आग्रह धरल्याने प्लास्टिक उत्पादक संघटनेने १५ डिसेंबर पासून उत्पादन बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर तोडगा न निघाल्यास पुन्हा एकदा राज्यात दूध कोंडी होऊ शकते. राज्यात जून महिन्यापासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. दूध अत्यावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्याने दुधाच्या पिशव्यांवर तूर्तास बंदी नाही. मात्र, एक्सटेंडेड प्रोड्यूसर रिस्पॉन्सिबिलीटी (इपीआर) अंतर्गत दुधाच्या पिशव्यांना इपीआर क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच या सर्वच पिशव्या गोळा करुन त्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र दुधाच्या या पिशव्या नक्की कोणी गोळा करायच्या यावरुन तिढा निर्माण झाला आहे. आमचे काम केवळ प्लॅस्टीक पिशव्या बनविण्याचे आहे. आम्हाला प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करणे शक्य होणार नाही. एखाद्या उत्पादकाने पुण्यात दूध पिशवी पॅकिंग करुन मुंबईला विक्री केल्यास त्या पिशव्या गोळा कशा करणार, अशी भूमिका प्लास्टिक उत्पादकांच्या संघटनेने घेतली आहे. मात्र, या पिशव्या गोळा करुन मिळाल्यास त्यावर प्रक्रिया करण्याची तयारी संघटनेने दर्शवली आहे. नक्की दूध पिशव्या कोणी गोळा करायच्या याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ हे काम प्लॉस्टिक उत्पादकांनी करावे असा आग्रह धरत आहे. अन्यथा कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे राज्यात कोणाही व्यावसायिकाला इपीआर क्रमांक दिलेला नाही, असेही प्लास्टिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. प्रदुषण मंडळाकडून असाच दबाव राहिल्यास आम्हाला १५ डिसेंबर पासून उत्पादन बंद करावे लागेल, असेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दुग्ध व्यावसायिकांनी आम्हाला या पिशव्या गोळा करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. प्लास्टिक उत्पादकांनी उत्पादन बंद केल्यास १५ डिसेंबरनंतर पिशवी बंद दूध वितरीत करता येणार नसल्याचे दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या पदाधिकाºयांनी सांगितले.
दूध पिशव्यांचे उत्पादन बंद करण्याचा प्लास्टिक असोसिएशनचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 6:56 PM
दुधाच्या प्लास्टिक पिशव्या कोणी गोळा करायच्या यावरुन तिढा निर्माण झाल्याने दुधाच्या पिशव्यांचे उत्पादन बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देराज्यात जून महिन्यापासून प्लास्टिक बंदी लागू सर्वच पिशव्या गोळा करुन त्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक दुधाच्या या पिशव्या नक्की कोणी गोळा करायच्या यावरुन तिढा निर्माण