लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्हा परिषदेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वरमहाराज आणि श्री संत तुकाराममहाराजांची आषाढी वारी आरोग्यदायी, स्वच्छ आणि प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, फिरते स्वच्छतागृह, वारीचा मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी औषध फवारणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे १७ जून आणि १६ जूनपासून आळंदी आणि देहू येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. या वारीमध्ये विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहामध्ये गटविकास अधिकारी, सरपंच आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. समजाकल्याण विभागाचे सभापती सुजाता चौरै, महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे, आरोग्याधिकारी डॉ. भगवान पवार, आरोग्याधिकारी डॉ. संजय जठार उपस्थित होते. पालखी ज्या ठिकाणी विसावा घेते किंवा मुक्कामी असते त्या ग्रामपंचायतींना यात्रा निधी उपलब्ध करून द्यावा. पालखीमध्ये सॅनिटरी नॅपकिन आणि टॉयलेट सोपची व्यवस्था करावी. दिवे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे. पालखी मार्गस्थ होण्यापूर्वी कचरा काढून टाकावा. पालखी विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा आणि विजेचे दिवे लावण्यात यावे. घाटामध्ये दरडी कोसळू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. पालखी सोहळ्यासाठी पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी. पाणी शुद्ध करण्याचे ओषध विहिरीमध्ये टाकण्याऐवजी टॅँकरमध्ये टाकावे. पालखी काळामध्ये अपघात होणाऱ्या रुग्णांना त्वरित उपचार मिळावे यासाठी ससून आणि इतर खासगी रुग्णालयाशी समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सासवड रस्त्यावरील अतिक्रमण काढावे. पालखी मार्गावरील खड्डे दुरुस्त करावे, अशा सूचना गटविकास अधिकारी आणि नागरिकांनी केल्या होत्या. १५ जूनपूर्वी ग्रामपंचायतींना यात्रा अनुदान दिले जाईल. वारीमध्ये आठशे फिरती शौचालये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पालखी विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामपंचायतीने वाळू पसरावी, ज्यामुळे पावसाळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही. औषध फवारणीही केली जाईल. टॉयलेट सोपचीही व्यवस्था केली जाणार आहे. हिवताप औषध फवारणीसाठी जिल्हा परिषद निधी देणार आहे, असे दौलत देसाई यांनी सांगितले.वारीच्या काळात फोन न घेणाऱ्यांवर कारवाई करणारवारीच्या काळामध्ये ग्रामसेवक किंवा संबंधित विभागाचे अधिकारी फोन घेत नाहीत. महावितरण विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरते वीज कनेक्शनसाठी आगाऊ पैसै घेतात, अशी तक्रार ग्रामसेवकांनी वारीच्या नियोजन बैठकीमध्ये केली होती. यावर देसाई यांनी वारीच्या काळात फोन न घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तात्पुरता वीज मीटर घेण्यासाठी आगाऊ पैसै घेऊ नये, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, ग्रामपंचायतीने कोणत्याही परिस्थितीमध्ये अनधिकृतपणे वीजपुरवठा घेऊ नये.- दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
प्लॅस्टिकमुक्त वारी करणार
By admin | Published: June 03, 2017 1:43 AM