अजितदादांची एक खेळी; 'क्लिनचीट'सह 'तो' डागही साफ, शिवाय उपमुख्यमंत्रीपदही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 05:41 PM2019-11-25T17:41:41+5:302019-11-25T17:45:19+5:30
अजित पवारांनी एक निर्णय घेऊन आपले तीन कामं भाजपकडून करून घेतली आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्यामुळे अजित पवार आता पूर्णपणे क्लिनचिट असल्याची भावना भाजपनेत्यांसह कार्यकर्त्यांची झाली असंच म्हणावं लागत आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - सिंचन घोटाळ्यामुळे मलिन झालेली प्रतिमा आणि धरणात लघूशंका करण्यासंदर्भातील ते वादग्रस्त वक्तव्य यासह राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे स्वप्न अजित पवार यांनी एकाच खेळीत पूर्ण केले. अजित पवार यांची राजकीय खेळी शरद पवारांच्याही एक पाऊल पुढे निघाली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
2014 मध्ये अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते. या आरोपांचे भांडवल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. अजित पवारांविरुद्ध आपल्याकडे गाडीभर पुरावे असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले होते. आता त्याच अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदी संधी देऊन फडणवीसांनी स्वत:च्या दाव्यापासून कोलांटउडी मारली आहे.
2014 पूर्वी अजित पवार यांनी धरणात लघूशंका करण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवारांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तसेच मॅसेजही व्हायरल झाले होते. भाजपने या वक्तव्याच्या आधारे अजित पवारांची प्रतिमा मलिन करण्याची एकही संधी सोडली नव्हती. निवडणुकीत हा मुद्दा उचलला होता. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर लागलेला त्या वक्तव्याचा डाग आपोआप पुसला गेला आहे.
दरम्यान राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत येणार अशी शक्यता निर्माण झाली होती. अजित पवारांनी भाजपचा रस्ता धरला. भाजपने देखील त्यांना सोबत येताच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यापाठोपाठ अजित पवार यांच्याविरुद्ध सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या असलेल्या केसेसे मागे घेऊन त्यांना दिलासा दिला.
एकूणच अजित पवारांनी एक निर्णय घेऊन आपले तीन कामं भाजपकडून करून घेतली आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्यामुळे अजित पवार आता पूर्णपणे क्लिनचिट असल्याची भावना भाजपनेत्यांसह कार्यकर्त्यांची झाली असंच म्हणावं लागत आहे.