पुणे : देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही. जिथे लोकशाहीचे राज्य आहे, तिथे सर्वगुणसंपन्न गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिळायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरु रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केली. भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, राष्ट्राचा नेताही गणपतीसारखा असायला हवा. गणपतीप्रमाणे मोठे कान हवेत. म्हणजे त्याने प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यावे. अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा आदर करावा. त्याची वाणी लोकांच्या भावनांचा आदर करणारी हवी. नाक मोठे असावे, म्हणजे लोकांच्या समस्या लगेच समजण्याची क्षमता असावी. राष्ट्रहिताची सर्व गुपिते पोटातच राहायला हवीत. त्याचे वाहन उंदीर म्हणजे जनता हवी. कररूपी ओझ्याने लोक दाबुन जाऊ नयेत, असे ओझा म्हणाले.
राजकारण करिअर म्हणून निवडावेदेशाला प्रगल्भ नेत्यांची गरज आहे. आपले जीवन सुखकर करायचे असेल, आपल्या अपेक्षा पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी चांगले नेतेही हवेत. लोकशाहीसाठी तेजस्वी, तपस्वी, तत्पर तरुणांची गरज आहे. म्हणून तरुणांनो राजकारणात या. त्याची करिअर म्हणून निवड करा, असे आवाहन माजी शिक्षण मंत्री राजेश टोपे यानी केले.