मुंबई : ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला हजर करण्यासाठी मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाने वॉरंट जारी केले. ७ जानेवारी रोजी त्याला हजर करण्याचे निर्देश विशेष न्यायालयाने दिले आहेत.ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांची ११ जून २०११ रोजी पवई येथील राहत्या घराजवळ गोळ््या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी छोटा राजनला आरोपी केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जे. डे यांनी छोटा राजनविरुद्ध लिहिलेल्या दोन लेखांबाबत छोटा राजन संतापला होता. या लेखांमुळे त्याची बदनामी झाल्याचे छोटा राजनला सतत वाटत होते. त्यातच पत्रकार जिग्ना वोरा हिने जे. डे यांची हत्या करण्यासाठी छोटा राजनला चिथावणी दिली. वोराने व्यावसायिक वैरातून जे. डे यांना मारण्यासाठी छोटा राजनला चिथावल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. या केसमधील मुख्य आरोपी विनोद असरानी उर्फ विनोद चेंबूरचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला आहे. डे यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोघांची ओळख विनोदनेच पटवली होती. त्याच्या मृत्यूमुळे सरकारी पक्षाचे नुकसान झाले असले, तरी छोटा राजन हाती लागल्याने आरोपींना शिक्षा होईल, अशी आशा पोलिसांना वाटत आहे. (प्रतिनिधी)
छोटा राजनला न्यायालयात हजर करा
By admin | Published: December 23, 2015 1:27 AM