दोन दिवसांपूर्वी राजापूरमध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम यांची भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांनी भेट घेतलेली. यावेळी त्यांचे स्वागत आणि छोटेखानी सभा घेतली होती. यानंतर कदमांनी राणेंना पाठिंबा दिल्याची चर्चा रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात रंगली होती. यावर आता कदमांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मिडीयाने अर्धसत्य दाखवल्यामुळे मी व्यथीत झालो आहे. मेहरबानी करा माझ्या घरी येऊ नका असे मी नारायण राणेंना सांगितले होते. परंतु तरीही ते आले आणि मग माझाही नाईलाज झाला. निवडणुकीत मतदान करून उपकाराची परतफेड करणं हे माझ्या तत्वात बसत नाही, कारण मी जिथे आहे तिथे कायम आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले.
मैत्री जपलीत त्याबद्दल धन्यवाद. पण मी माझे मतदान तुम्हाला देणार नाही. हे माझे वाक्य होते. मतदान मी स्वतः तुम्हाला करणार किंवा आणखी कोणाचा प्रचार करणार, राणेंना मत टाकणार हे कधीही माझ्या तोंडातून आलेले नाही आणि येणार पण नाही. परंतु दादा तुम्ही उभे राहा मी तुमच्या पाठीशी आहे, असे चित्र मिडीयाने रंगवले त्यामुळे दुःख झाले, अशी खंत कदम यांनी व्यक्त केली.
नारायण राणेंसाठी फडणवीस सभा घेणार...
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजापूर दौऱ्यावर येत आहेत. बहु चर्चेतील लोकसभा मतदारसंघात फडणवीस यांची जाहीर सभा आहे. राजापुरातील राजीव गांधी क्रीडांगणावर होणार सभा होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणेंविरुद्ध राऊत अशी थेट निवडणूक होणार आहे.