नाशिक : शेतकऱ्यांवर ओढवलेले अरिष्ट दूर करण्यासाठी कर्जमाफी गरजेची आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा द्यायचा आहे. विजय मल्ल्या व इतर उद्योगपती भांडवलदारांना शासन कर्जमाफी करते; मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी का करीत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.मालेगाव येथील मनमाड चौफुलीवर सोमवारी शेतकरी संघर्ष यात्रेचे आगमन झाले. जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, नामपूर, चांदवड तसेच पिंपळगाव येथे सभा झाल्या. आम्हा सर्वांची आमदारकी-खासदारकी गेली तरी पर्वा नाही, पण संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नामपूर येथे केले. आई-वडिलांकडे लग्नासाठी पैसे नसल्याने उपवर मुली आत्महत्या करू लागल्या आहेत. कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नसल्याने राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे, पण सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, असे त्यांनी सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कर्जामुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. तरुण शेतकरी जीवनयात्रा संपवित आहेत. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचेही कर्ज माफ करा
By admin | Published: April 18, 2017 5:46 AM