मुंबई: वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण सोसायटी इमारत घोटाळ्यातून आपले नाव आरोपींमधून न वगळण्याच्या निर्णयाचा न्यायालयाने फेरविचार करावा, असा युक्तिवाद माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावतीने उच्च न्यायालयात केला गेला.अॅड़ अमित देसाई यांनी हा युक्तिवाद केला़ ते म्हणाले, याप्रकरणात चव्हाण यांना गोवले आहे़ या घोटाळ्याशी त्यांचा काहीही संबंध नाही़ तेव्हा या घोटाळ्यातून नाव न वगळ्याच्या निकालाचा न्यायालयाने फेरविचार करावा़ न्या़ एम़ एल़ ताहिलयानी यांच्यासमोर ही सुनावणी झाली़ त्यात अॅड़ देसाई यांनी या मुद्दयाशी संबंधी सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल सादर करण्यास वेळ द्यावा, अशी विनंती केली़ न्यायालयाने ती मान्य केली़ चव्हाण यांच्याविरोधात या घोटाळ्याचा खटला चालवण्यासाठी सीबीआयने माजी राज्यपाल के़ शंकरनारायणन् यांच्याकडे परवानगी मागितली होती़ ती नाकारण्यात आली़ त्यामुळे सीबीआयने चव्हाण यांचे नाव या घोटाळ्यातून वगळण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला़ न्यायालयाने तो फेटाळला़ त्यानंतर सीबीआयने यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली़ न्या़ ताहिलयानी यांच्यासमोरच याची सुनावणी झाली़ त्यांनीही सीबीआयची याचिका फेटाळली़ या निकालाचा फेरविचार करण्यासाठी चव्हाण यांनी स्वतंत्र याचिका केली आहे़ (प्रतिनिधी)
‘आदर्श’ खटल्यात आरोपी करण्याचा फेरविचार करा
By admin | Published: January 21, 2015 2:02 AM