- हातकणंगले तालुका शारीरिक शिक्षक संघटनेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
इचलकरंजी : भावी पिढी सक्षम आणि सुदृढ घडविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना शासनाने यंदापासून कला-क्रीडा आणि कार्यानुभव विषयक पुस्तकांची छपाई बंद केली आहे. शिवाय अतिथी नेमणुकीमुळे क्रीडाशिक्षकांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. शासनाने वेळीच विचार करून क्रीडाशिक्षकांवर होणारा अन्याय दूर करावा, अशा मागणीचे निवेदन हातकणंगले तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना देण्यात आले.हातकणंगले तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर शहा व दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे शिक्षण मंत्री तावडे यांना भेटले. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवी ते आठवीसाठी आवश्यक कला-क्रीडा आणि कार्यानुभव या पाठ्यपुस्तकांची छपाईच बंद केली आहे. क्रीडाशिक्षकांऐवजी अतिथी नेमण्याचे धोरण शासनाने घेतले आहे. अशा अतिथींची विश्वासार्हता काय असणार, कोणत्या पात्रतेच्या आधारे त्यांची नेमणूक केली जाणार, शिवाय विद्यार्थी-विद्यार्थिनींची जबाबदारी ते पेलू शकणार काय, हेही अनुत्तरीत आहे. त्यामुळे राज्य शासनाचे क्रीडाबद्दल नेमके धोरण काय आहे, याची स्पष्टता होत नाही. जिल्हा विभागात विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंना भत्ता म्हणून अवघे ४० ते ६० रुपये दिले जातात. त्यामध्ये नाष्टा,जेवण, आदींचा समावेश असतो. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात ते अपुरे असल्याने हा भत्ता वाढवून मिळणे आवश्यक आहे. शासनाने उपरोक्त मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा; अन्यथा नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.या शिष्टमंडळात रावसाहेब कारंडे, शंकर पोवार, संदीप लवटे, शिवाजी पाटील, अलका पाटील, रघु पाटील, आदींसह संघटनेचे पदाधिकारी व क्रीडाशिक्षक यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)