पनवेल : सिडको स्थापन होऊन जवळपास ४७ वर्षांचा कालावधी उलटला. मात्र अद्यापही नवी मुंबई परिसरातील गावांना प्राथमिक सुविधा मिळालेल्या नाहीत. ठाणे, रायगड जिल्ह्यातील गावाच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या. मात्र याठिकाणीही सोयी-सुविधांची वानवाच आहे. अशीच अवस्था पनवेल महापालिकेत गावांची होऊ नये म्हणून सर्व गावकऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्धार करीत गावोगावी बैठक सुरू केल्या आहेत. रविवारी कोपरा गावात यासंदर्भात बैठक पार पडली. अॅड. सुरेश ठाकूर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या इंडियन सिटीझन फोरमच्या माध्यमातून या बैठका घेतल्या जात आहेत. कोपरा सुधागड विद्यालयात पार पडलेला बैठकीला ठाकूर यांच्यासह, रमाकांत पाटील, सुधाकर तोडकर, रतन भोईर, नरेश ठाकूर, शिवदास गायकर, हरेश केणी, गुरु नाथ गायकर, मुरलीधर पाटील, संतोष तांबोळी, फारूक पटेल आदींसह मोठ्या संख्येने कोपरा गावातील रहिवासी उपस्थित होते. यावेळी कोपरा गावातील समस्या, अडचणी आदींवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कोपरा गावात बंद पडलेल्या टाकीचे पिण्याचे पाण्याचे काम, धुरीकरण, प्राथमिक सोयी- सुविधा, गरजेपोटी घरे आदी महत्त्वाच्या बाबीवर चर्चा झाली. यासंदर्भात गावकऱ्यांच्या समस्या जाणून यासंदर्भात पालक आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना निवेदन देणार असल्याचे रमाकांत पाटील यांनी सांगितले. तसेच गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा निर्धार यावेळी गावकऱ्यांनी केला. प्रकल्पग्रस्तांचा लढा हा कायदेशीर मार्गाने लढला जाणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी गावबैठकांना उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 2:42 AM