ईडीच्या कारवाईमुळे शिंदे गटात गेलेल्या गजानन किर्तीकरांनी लोकसभा निवडणूक होताच विरोधी वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. ऐक लोकसभा निवडणुकीतही त्यांनी वेगवेगळी वक्तव्ये करून आपण शिंदे गटात बळजबरीने आल्याचे संकेत दिले होते. आता त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येत असताना भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी किर्तीकरांवर गंभीर आरोप केले आहेत.
शिंदे गटात गेल्यामुळे मी कुटुंबात एकटा पडलो. मातोश्रीपासून दुरावल्याचे व कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटात आल्याचे वक्तव्ये किर्तीकरांनी केली आहेत. किर्तीकरांचा मुलगा अमोल किर्तीकर ठाकरे गटाकडून लोकसभा लढवत होता. त्याला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन किर्तीकरांचा डाव होता, असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे. यावर किर्तीकरांनी देखील प्रत्युत्तर देत कटकारस्थाने करणे मला जमत नाही ती भाजपाची सवय आहे, असा टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळविण्यासाठी गजानन किर्तीकर शिवसेनेत आले. उमेदवारी मिळाल्यावर अचानक अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट त्यांनी रचला होता असा माझा आरोप असल्याचे दरेकर म्हणाले होते. यावर उत्तर देताना किर्तीकरांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. अमोलने निवडणूक लढविण्याचे आधीच जाहीर केले होते. तसेच तो शिंदे गटाकडून लढण्यास तयार नव्हता. माझे निवृत्तीचे वय झाले होते व मुलाविरोधात लढणे योग्य नसल्याने मी लढणार नसल्याचे आधीच जाहीर केले होते, असा खुलासा किर्तीकर यांनी केला आहे.
मविआला चांगल्या जागा मिळतील - गजानन कीर्तिकरमी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते. पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो. आज टर्निंग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो, अशी खंत मतदानानंतर गजानन कीर्तिकर यांनी सोमवारी व्यक्त केली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे. ठाकरेंना सोडून अमोेल जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गजानन कीर्तिकर यांनी २०१९ मध्ये मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून २.६० लाखांच्या मतांच्या फरकाने जिंकली होती. त्यांनी निरूपम यांचा येथे पराभव केला होता. आपण पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करून राजधर्माचे पालन करणार असल्याचे गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले होते. परंतु ते प्रत्यक्ष प्रचारात आले नव्हते. यामुळे किर्तीकर आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून हा वाद मिटवावा असा सल्ला मंत्री दिपक केसरकर यांनी दिला आहे.