पुणे-बंगळूर हायवेवर थरार : लुटारुंनी पळवलेली जीप कासेगावमध्ये सापडली
ऑनलाइन लोकमत
क-हाड ( सातारा ), दि. २७ - पुण्यातील व्यापा-याने निपाणीकडे पाठविलेली साडेअकरा लाखाची रोकड कामगारांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्यात आली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार, ता. क-हाड गावच्या हद्दीत मध्यरात्री ही घटना घडली. दरम्यान, चोरट्यांनी पळवून नेलेली नेलेली जीप कासेगावच्या हद्दीत बेवारस आढळली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे.
याबाबत जगदीश जेठाराम बिश्नोई (रा. टिंबर मार्केटनजीक, पुणे) याने क-हाड तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या बाडनेर जिल्ह्यातील जगदीश बिश्नोई हा गत काही वर्षापासून पुणे येथे मोलमजुरीसाठी वास्तव्यास आहे. सध्या तो पुणे-कोंडवा येथील प्रकाश घाशी यांच्याकडे चालक म्हणून काम करतो. प्रकाश घाशी यांचे निपाणीतील व्यापा-याशी वारंवार आर्थिक व्यवहार होत असतात. त्यामुळे जगदीश बिश्नोई याने यापुर्वी दोन ते तीनवेळा पैशाची ने-आण करण्याचे काम केले आहे. बुधवारी रात्री जगदीश हा मित्र राजेश चौधरी याच्यासह प्रकाश घाशी यांच्या घरी गेला. त्यावेळी घाशी यांनी त्याला साडेअकरा लाख रूपये घेऊन निपाणीला जायचे आहे, असे सांगीतले. तसेच पैसे घेऊन जाण्यासाठी त्यांनी जगदीशला त्यांच्या मित्राची पिकअप जीप (क्र. एमएच १२ एलटी ५९५५) मिळवून दिली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जगदीश व त्याचा मित्र राजेश हे दोघेजण पिकअपमधून साडेअकरा लाखाची रक्कम घेऊन पुण्यातून निपाणीला जाण्यासाठी निघाले.
क-हाडपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आल्यानंतर जगदीश लघुशंकेसाठी जीपमधून खाली उतरला. तेव्हा दुचाकीवरून तिघेजण त्याठिकाणी आले. त्यांनी जगदीशला धक्काबुक्की केली. तसेच त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. जगदीश आरडाओरडा करत असतानाच दोघेजण जीपच्या दिशेने गेले. त्यांनी क्लिनर बाजूस बसलेल्या राजेशच्या डोळ्यातही मिरची पूड टाकून त्याला बाहेर ओढले. त्यानंतर दोघांनी जीप चालू करून कोल्हापूरच्या दिशेने पोबारा केला. तर एकजण दुचाकीवरून निघून गेला.
जगदीश व राजेश यांनी मदतीसाठी महामार्गावरील वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतेही वाहन थांबले नाही. दरम्यान, काहीवेळात रात्रगस्तीची पोलीस जीप त्याठिकाणी पोहोचली. त्यांनी त्या दोघांकडे चौकशी केली असता घडलेला प्रकार समजला. त्यानंतर पोलीस जीपने संशयीतांचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी बहे तांबवे-कासेगाव गावच्या हद्दीत पिकअप जीप बेवारस स्थितीत आढळून आली. चोरट्यांनी साडेअकरा लाखाची रोकड लंपास करून जीप तेथून सोडून दिली होती. याबाबतची नोंद क-हाड तालुका पोलिसात झाली आहे.