कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्या वतीने (नॅक) शिवाजी विद्यापीठाला ए-प्लस प्लस असे मूल्यांकन बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आले. या मूल्यांकनातून विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे.नॅक मूल्यांकन समितीचे अध्यक्ष मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जे. पी. शर्मा, सदस्य सचिव डॉ. बी. आर. कौशल (बेंगलोर), डॉ. एसएएच मुनोद्दीन (पश्चिम बंगाल), डॉ. तरुण अरोरा भटिंडा (पंजाब), डॉ. सुनीलकुमार (दिल्ली), डॉ. हरीश चंद्रादास (मेघालय) यांनी शिवाजी विद्यापीठाला दि. १५ ते १७ मार्च या कालावधीत भेट देवून मूल्यांकन केले.
संख्यात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन टप्प्यांमध्ये नॅक मूल्यांकन त्यांनी केले. त्यातील ७० टक्के संख्यात्मक माहिती नॅकला सादर केली आहे. उर्वरित ३० टक्के विश्लेषणात्मक मूल्यांकनासाठी या समितीने विद्यापीठाला भेट दिली होती. या समितीने पाहणीचा अहवाल बेंगलोर येथील नॅकला सादर केला होता.
त्यानंतर पुढील प्रक्रिया होवून नॅकच्यावतीने विद्यापीठाचे मूल्यांकन जाहीर करण्यात आले. त्यात विद्यापीठाला ३.५२ सीजीपीएससह ए-प्लस प्लसअसे मूल्यांकन मिळाले आहे. या मानांकनाबद्दल विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, आदी घटकांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आदींवर दूरध्वनीवरून शुभेच्छांचा वर्षाव केला.
शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ए-प्लस प्लस हे मानांकन मिळाल्याचा खूप आनंद आहे. विद्यापीठाच्या प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे हे मानांकन मिळाले आहे. मानांकनाबाबतच्या या यशाचे सर्व श्रेय या घटकांचे आहे.-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू.